प्रवासी-विद्यार्थ्यांचा पुलावरील प्रवास जीवघेणा : संरक्षक कठडे ताबडतोब बांधण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगाव-कोनेवाडी मार्गावरील भैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे नसल्याने सदर पूल धोकादायक बनला आहे. सदर पुलाच्या दुतर्फा संरक्षण कठडे बसवावेत, अशी मागणी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या उचगाव, तुरमुरी, कोनेवाडी गावातील प्रवासीवर्गाने केली आहे. उचगाव भागातील नागरिकांना कोनेवाडी, शिनोळी, देवरवाडी, महिपाळगड, सुंडी भागात ये-जा करण्यासाठी कमी अंतराचा हा रस्ता महत्त्वाचा आहे. अनेक प्रवाशांना उचगावहून बेळगाव-वेंगुर्ले मार्गे जाऊन तुरमुरीमार्गे कोनेवाडी परिसरात जावे लागते. किंवा देवरवाडी परिसरातील नागरिकांना तुरमुरी गावाकडून बेळगाव-वेंगुर्ले मार्गे उचगाव परिसरात यावे लागते.
उचगाव-कोनेवाडी हा अॅप्रोच रस्ता कमी अंतराचा व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या मार्गे रोज अनेक प्रवासी ये-जा करत असतात. रात्रीच्या वेळी ये-जा करत असताना या पुलावरूनच प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येते. मात्र सदर पुलाची रुंदी कमी असून दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नसल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. कोनेवाडी गावाकडून उचगावकडे येत असताना उतरतीचा भाग असल्याने सायकल अथवा दुचाकीवरून भरधाव येणाऱ्या एखाद्या वाहनाला जर या पुलाचा अंदाज आला नाही तर मोठा अपघात होऊन सदर वाहन नाल्यात कोसळण्याची शक्यता आहे. यामध्ये एखाद्याचा प्राणही जाऊ शकतो. कोनेवाडीतून रोज जवळपास 25 ते 30 विद्यार्थी उचगावमधील माध्यमिक शाळेत सायकलवरून ये-जा करतात. रोज याच पुलावरून विद्यार्थ्यांना उचगाव-कोनेवाडी प्रवास करावा लागतो.पुलाला कठडे नसल्याने पूल धोकादायक बनला आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठडे बांधणे महत्त्वाचे आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने पुलाच्या दुतर्फा संरक्षण कठड्याची व्यवस्था करावी. अन्यथा एखाद्याला जीवाला मुकावे लागण्याची वेळ येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.









