वृत्तसंस्था/ स्टॅव्हेन्गर (नॉर्वे)
जागतिक जलद बुद्धिबळ विजेती आणि भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हंपी मे महिन्यात होणाऱ्या नॉर्वेतील महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणार आहे. महिलांच्या क्लासिकल बुद्धिबळात सध्या हंपी जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. वरील प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेत आपला ठसा उमटविण्याचे हम्पीचे ध्येय आहे.
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेचे हम्पीचे पुनरागमन तिच्या उल्लेखनीय कारकिर्दीवर प्रकाश टाकते. 2002 मध्ये बुद्धिबळ इतिहासातील स्थान सुरक्षित करताना ती ग्रँडमास्टर किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. आजही ती भारतातील अव्वल क्रमांकाची महिला खेळाडू आहे. 2019 आणि 2024 असे दोनदा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणेही तिच्या कामगिरीचा समाविष्ट आहे. भारतीय क्रीडाक्षेत्रातील हम्पीच्या योगदानाची दखल घेऊन तिला 2020 मध्ये ‘बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ दि इयर’ म्हणून गौरविण्यात आले होते.
ऑलिम्पियाड, आशियाई खेळ आणि आशियाई स्पर्धेतील हम्पीच्या विजयांनी बुद्धिबळातील आघाडीच्या महिला खेळाडूंपैकी एक म्हणून तिचे स्थान आणखी भक्कम केले आहे. प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत खेळणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे, असे हम्पीने म्हटले आहे. स्वत:चे वर्णन करण्यास सांगितल्यावर तिने शिस्तबद्ध हा शब्द निवडला, जो तिचा बुद्धिबळाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही स्पष्ट करतो. या शिस्तीने तिला अगदी कठीण प्रतिस्पर्ध्यांविऊद्धही एकाग्र होण्यास आणि सातत्यपूर्ण तसेच लवचिक राहण्यास मदत केली आहे. नॉर्वे चेसचे संस्थापक आणि स्पर्धेचे संचालक केजेल मॅडलँड यांनी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत हम्पीचे परत स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, असे म्हटले आहे.









