चार शेतकरी गंभीर जखमी
मळेवाड :
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरा देऊळवाडी येथे रविवारी 5 जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या हल्ल्यात प्रभाकर मुळीक, सूर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर, आणि आनंद न्हावी हे चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना गोवा बांबुळी येथे वैद्यकीय महाविद्यालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, बिबट्याच्या या अचानक हल्ल्याने देऊळवाडीसह संपूर्ण परिसर धास्तावला आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. वनविभागाकडून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे.








