जिल्ह्यातील वाचन मंदिरांना ती अक्षरभेट देणार – किरण सामंत
आचरा | प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने अलीकडे प्रकाशित केलेली ‘बीज अंकुरे अंकुरे’ (ललित) आणि ‘ये ग ये ग सरी’ (कविता संग्रह) ही दोन्ही पुस्तके म्हणजे वाचकांसाठी अक्षरमेवा आहे. दोन्ही पुस्तकातील जवळजवळ २० लेखक आणि २५ कवी हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. आणि नवोदित आहेत. माझ्या जन्मगावाच्या जिल्ह्याने हा केलेला अभिनव प्रयोग महाराष्ट्रात अन्य कुठेही झाला नाही. मी हे दोन्ही ग्रंथ माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ १३० ग्रंथालयांना नवीन वर्षाची आणि माझ्या वाढदिवसाची अक्षर भेट म्हणून विनामूल्य देणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते किरण सामंत उर्फ भैय्यासाहेब सामंत यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे मित्र महेश राणे, संपादक सुरेश ठाकूर उपस्थित होते.
अक्षर भेट वितरण सोहळा रामेश्वर वाचन मंदिर आचरे येथे होणार
सदर अक्षर ग्रंथभेट योजनेचा शुभारंभ मंगळवार दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठीक तीन वाजता रामेश्वर वाचन मंदिर आचरेच्या १३० व्या वर्धापनदिनी होणार आहे. यावेळी किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत यांचे स्नेही महेश राणे दोन्ही ग्रंथ रामेश्वर वाचन मंदिर आचरेला प्रदान करणार आहेत. त्यानंतर इतर १३० वाचनालयांना ग्रंथ वितरित होतील. सुरेश ठाकूर (अध्यक्ष) आणि कोमसाप मालवण कार्यकारिणी तसेच बीज अंकुरे अंकुरेचे सर्व लेखक आणि” ये ग ये ग सरी चे ” सर्व कवी यांनी किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत यांचे आभार व्यक्त केले.