पुणे / प्रतिनिधी :
आयपीएलच्या या सीझनमधील प्लेऑफचे आव्हान कसेबसे जिवंत ठेवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि मागील सलग चार मॅच हरणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी सामना होणार आहे. दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडेसातपासून रंगणार आहे. हैदराबाद दहा गुणांसह सहाव्या क्रमांकावर (रनरेट)च्या आधारावर तर, कोलकाता दहा गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने मुंबईला मागच्या सामन्यात पराभूत केले आहे. तर, हैदराबाद सलग चार सामन्यात पराभूत झाला आहे.
कोलकात्याच्या सलामीचा प्रश्न कायम आहे. सलामीची जोडी सारखी बदलण्यात येत आहे. त्यामुळे कोणालाच स्थिरस्थावर होता आलेले नाही. बाबा इंद्रजित-ऍरॉन फिंच, रहाणे-व्यंकटेश अय्यर अशा विविध पर्यायांचा वापर झाला आहे. सलामवीर म्हणून फिंच, बाबा इंद्रजित यांना फारशी चमक दाखवता आली नाही. रहाणे-व्यंकटेश अय्यर यांना मागच्या सामन्यात सुरुवात मिळाली होती. पण, त्याचा फायदा ते घेऊ शकले नाही. यानंतर श्रेयस अय्यरला धावा कराव्या लागतील. यानंतर नितीश राणा, रिंकू सिंग यांना मधली फळी सांभाळावी लागेल. रसेलचा फॉर्म हा कोलकात्यासाठी डेकेदुखी ठरत आहे. त्याच्या धावांचा ओघ आटल्याने कोलकात्याला अडचण निर्माण होत आहे. नरीनला गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीमध्ये योगदान द्यावे लागेल. टीम साऊथी, उमेश यादव, शिवम मावी यांच्यावर गोलंदाजीचा भार असणार आहे. तर, सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती यांच्यावर फिरकीची मदार असणार आहे.
केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा या सलामवीरांना धावा कराव्या लागतील. यानंतर राहुल त्रिपाठीला आपल्या धावांचा ओघ कायम ठेवावा लागेल. मधल्या फळीत ईडन मार्करम, निकोलस पूरन, प्रियम गर्ग यांच्यावर फलंदाजी अवलंबून असणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये हैदराबाद हरण्याचे मुख्य कारण म्हणजे वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन या आघाडीच्या गोलंदाजांना झालेल्या दुखापती. तसेच वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा अचानक फॉर्म जाणे, हे हैदराबादच्यादृष्टीने चांगले लक्षण नाही. त्यामुळे सगळा भार भुवनेश्वर कुमारवर येत आहे. त्यामुळे हैदराबादला गोलंदाजीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
आयपीएलमधून कमिन्सची माघार, कोलकात्याला धक्का
आयपीएलच्या या सीझनमध्ये मुंबईचा पराभव करून कोलकात्याने आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. यातच पॅट कमिन्सने आयपीएलमधून दुखापतीमुळे माघार घेतल्याने कोलकात्याला धक्का बसला आहे. कमिन्स ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. त्याला दोन आठवडय़ांची विश्रांती सांगितली आहे. त्यानंतर तो परत मैदानात परतेल.









