11 राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व करत पाडला पदकांचा पाऊस, जलतरणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शासन कोट्यातून रेल्वेत मिळाली नोकरी,
कोल्हापुरातील प्रसिद्ध पेठांपैकी एक पेठ म्हणजे जुना बुधवार पेठ. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांनी भूमीगत होऊन याच पेठेत आश्रय घेतल्याने या पेठेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या पेठेत लेखक आहे. नामवंत चित्रकार होते आणि त्यांची पिढीही चित्रकार म्हणून कार्यरत आहे. शिवकालीन युद्धकला शिकवणारे वस्ताद आहेत. नामवंत फुटबॉलपटूही आहेत. अशा या बहुआयामी जूना बुधवार पेठेतील गुणवंतांच्या यादीत राष्ट्रीय जलतरणपटू पृथ्वीराज प्रभाकर डांगेने स्थान मिळवले आहे. गेल्या आठ वर्षात त्याने 11 राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत प्रतिनिधीत्व करत पदकांची लयलूट केली आहे. विद्यापीठसह वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मिळवलेल्या पदकांची दखल घेऊन त्याला शासनाच्या क्रीडा कोट्यामधून वेस्टर्न रेल्वे मुंबईमध्ये ग्रुप डीमधून थेट शिपाई म्हणून नोकरी मिळाली आहे.
पृथ्वीराजचे वडील प्रभाकर डांगे हे जून्या काळातील जलतरणपटू. त्यांनी 1990 पासून जलतरण एनआयएस प्रशिक्षक म्हणून बजावलेली कामगिरी मोठी आहे. त्यांनी घडवलेले अनेक जलतरणपटू राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले आहे. पृथ्वीराज हा देखील वडील प्रभाकर यांच्या मुशीतच तयार झाला. आपल्याकडे शिकायला असलेल्या इतर मुला मुलींसोबत प्रभाकर यांनी पृथ्वीराजलाही कोल्हापूर जिल्हा क्रीडा संकुल शिवाजी स्टेडियमच्या जलतरण तलावात उतरवले. यावेळी पृथ्वीराज श्री अवधूत विद्यालयात पहिलीच्या वर्गात शिकत होता. रोज कसून सराव करत पृथ्वीराज हा फ्रीस्टाइल या प्रकारात चांगल्या पद्धतीने पोहू लागला. पोहताना वेगाने पुढे जाण्यासाठी दोन्ही बाहूत ताकद यावी म्हणून त्याने चार ते पाच वर्षे सराव केला. या सरावातून पृथ्वीराज शहरस्तरीय व जिल्हास्तरीय 6, 11, 12, 13, 14 वर्षाखालील मुलांच्या जलतरण स्पर्धेत 25, 50 फ्रीस्टाईल, बटरफ्लाय, ब्रेस्ट स्ट्रोक व आयएम या प्रकारातून सहभागी होऊ लागला. कौतूकास्पद कामगिरी करत सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकाची कमाईही केली.
शालेय स्पर्धेतील कामगिरी कौतूकास्पद…
आपण पदके जिंकू शकतो हा आत्मविश्वास आल्यानंतर पृथ्वीराजने शालेय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकताना त्याने शहर, विभागीय स्पर्धेत यश मिळवत आपले आव्हान निर्माण केले. काही कारणास्तव पृथ्वीराजने महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊन शालेय 14, 17, 19 वर्षाखालील जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व करत अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिकली. चौदा वयोगटातील राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या पृथ्वीराजने पुढील 3 वर्षात 17, 19 वर्षाखालील स्पर्धेत शहर, विभाग, राज्य अशा तिन्ही स्तरामधील 50, 100, 200 मीटर ब्रेस्टस्टोक या प्रकारात सुवर्ण पदके जिंकून राष्ट्रीय स्पर्धेत 3 वेळा प्रतिनिधित्व केले. यावेळी पृथ्वीराज न्यू कॉलेजमध्ये शिकत होता. पृथ्वीराजला आधुनिक प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी 2022 साली बेंगळूरमधील नीलकंठराव जगदाळे यांच्या बसवन गुढी स्विम सेंटरमध्ये दाखल केले. येथील कोच राजू आरएस यांच्या हाताखाली आधुनिक सराव करत पृथ्वीराज वरिष्ठ स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याइतपत तयारीचा बनला. शिवाय त्याने ब्रेस्टस्ट्रोक हा जलतरण प्रकार आपला फेव्हरेट केला. 2022-23 त्याने विभागीय, आंतरविभागीय जलतरण स्पर्धेतील 50, 100 फ्रीस्टाइल, बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, 50, 100, 200 ब्रेस्टस्ट्रोक व 200, 400 आयएम या पाचही प्रकारात सुवर्णपदकांची कमाई करत पृथ्वीराजने आपला दबदबा निर्माण केला.
आंतरविभागीय स्पर्धेत मिळवलेल्या पदकांची दखल घेऊन पृथ्वीराजला सर्वोत्कष्ट जलतरणपटू या किताबाने गौरवले. शिवाजी विद्यापीठाच्या जलतरण संघात त्यांची निवडही केली. या संघातून त्याने ओडिशात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत 50, 100, 200 ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारातून प्रतिनिधीत्व केले, परंतू पदक मिळाले नाही. परंतू नाउमेद न होता पृथ्वीराजने सराव सुरूच ठेवला. 2023-24 छत्रपती शहाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन विभागीय, आंतरविभागीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदकांचा पाऊस पाडत दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट जलरतणपटूचा किताब मिळवत दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवले. चेन्नईमध्ये झालेल्या पश्चिम-दक्षिण विभागीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत विद्यापीठातर्फे प्रतिनिधित्व करत 100, 200 ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात त्याने प्रत्येकी एक रौप्य पदक मिळवले. या कामगिरीमुळे पृथ्वीराजला चेन्नईतच झालेल्या अ. भा. आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा उठवत 100 ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्यपदक मिळवत शिवाजी विद्यापीठाचे नाव रोशन केले. या कांस्यपदकी कामगिरीमुळे प्रतिष्ठेच्या खेलो इंडिया जलतरण स्पर्धेत सहभागी होण्याची मिळाली. याही संधीचं सोनं करत त्याने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्य पदक जिंकले.
कोल्हापूर जिल्हा संघातूनही केली धडक कामगिरी…
शहाजी कॉलेजचे शिक्षण घेत पृथ्वीराज हा फेडरेशनच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभाग घेत होता. ठाण्यात झालली राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा त्यासाठी लकी ठरली. त्याने कोल्हापूर जिल्हा संघातून स्पर्धेत सहभाग घेऊन 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात प्रतिस्पर्धींना मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 50 व 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातही प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड केली. गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या 36 व्या नॅशनल गेम्सअंतर्गत झालेल्या जलतरण स्पर्धेत 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातून प्रतिनिधीत्व केले. परंतु पदक मिळाले नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मात्र कोल्हापूर जिल्हा संघातून शानदार कामगिरी करत 4 बाय 100 मीटर मिडले रिले या प्रकारात सांघिक कांस्य मिळवले. पाच महिन्यांपूर्वी पुण्यातच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने एक सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकून तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली काबिलियत सिद्ध केली. तसेच झारखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतसुद्धा महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व करत 4 बाय 100 मीटर मिडले रिले प्रकारात सांघिक कांस्यपदक पटकावले. या सर्व यशासाठी योग्य सराव, योग्य खुराक, योग्य विश्रांती आणि वडील प्रभाकर यांचे योग्य मार्गदर्शन कामी आले आहे.
पृथ्वीराजने रचला सागरी स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम….
शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि फेडरेशनच्या पातळीवरील आयोजित विविध जलतरण स्पर्धांमध्ये जशी पृथ्वीराजने कामगिरी केली आहे तशीच कामगिरी आव्हानात्मक अशा सागरी जलतरण स्पर्धेतही केली आहे. आजवर त्याने शिक्षण घेत घेत 11 सागरी जलतरण स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व केले. 2018 साली मालवणमधील चिवला बीच येथे आयोजित सागरी 5 किलोमीटर जलतरण स्पर्धेत वेगवान कामगिरी करत त्याने पहिला क्रमांक मिळवला. वेगवान जलतरणपटू म्हणून त्याला स्पर्धा आयोजकांनी सन्मानित केले. शिवाय पहिला क्रमांक पटकावताना त्याने पाच किलो मीटरचे आंतर 27 मिनीट 23 सेकंदात गाठत राष्ट्रीय विक्रमही रचला हा विक्रम आजही अबादीत आहे. 2019 साली मुंबईतील संकरॉक ते गेटवे ऑफ इंडिया 5 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेतही त्याने पहिला क्रमांक मिळवला. विजयदुर्गमध्ये ही झालेल्या 5 किलोमीटर अंतराच्या सागरी स्पर्धेतही त्याने पहिलाच क्रमांक पटकावला. गडहिंग्लजमधील हिरण्यकेशी नदीमध्ये ही पाच किलोमीटर आंतराच्या खुल्या गट जलतरुण स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक पटकाची किमया करत उपस्थितांची मने जिंकली होती.
माझ्या यशाचे श्रेय वडीलांसोबत आई माया डांगे यांनाही मी देतो. बहुसंख्य स्पर्धेच्या ठिकाणी आई ह्या माझ्यासोबतच होत्या. त्यांनी मला सतत प्रोत्साहित केले. शाळा, कॉलेजनेही मला स्पर्धेसाठी मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळे मी मोठे यश मिळवू शकलो. हे मी विसरणार नाही. आता आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत प्रतिनिधीत्व करणे हे लक्ष्य असून त्या दृष्टीने मी सराव करतो आहे.
पृथ्वीराज डांगे
संग्राम काटकर, कोल्हापूर









