शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार : हुतात्मा दिनी उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : आपल्या भाषेच्या राज्यात समावेश व्हावा म्हणून सीमावासियांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये अनेकजण हुतात्मे झाले. या हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. बेळगावमध्ये होणारा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून कोल्हापूर येथील आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. बुधवारी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक रंगुबाई भोसले पॅलेस येथे शहर म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
हुतात्मा चौक येथे होणाऱ्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाला सर्व सीमावासियांनी सकाळी 9 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. मदन बामणे यांनी सक्षम कार्यकारिणी तयार करण्याचा मुद्दा उपस्थित केला. विश्वनाथ सूर्यवंशी या ज्येष्ठ कार्यकर्त्याने लढ्याची पुढची दिशा कशी असायला हवी, याविषयी मार्गदर्शन केले. रमाकांत कोंडुसकर, अॅड. अमर येळ्ळूरकर, अनिल आमरोळे, रणजित चव्हाण-पाटील, शुभम शेळके, प्रकाश मरगाळे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष मालोजी अष्टेकर म्हणाले, यापुढे घटक समित्यांमधून आलेल्या प्रस्तावानंतरच मध्यवर्तीमध्ये निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगून सर्वजण म. ए. समितीचेच कार्यकर्ते असल्याने चुका बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.
म. ए. समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी
बेळगाव परिसरातील अधिकाधिक शेतकरी हा मराठी भाषिक आहे. शेती शिल्लक राहिली तरच मराठी भाषिक सीमाप्रश्नासाठी झगडू शकतो. परंतु हलगा-मच्छे बायपास, रिंगरोड यासह इतर प्रकल्पांसाठी मराठी भाषिकांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. याविरोधात म. ए. समितीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. म. ए. समिती प्रत्येक आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठीशी आजवर होती आणि यापुढेही राहील, असे आश्वासन देण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्र चौकासाठी लढा देणार
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चौकाच्या नावात बदल करण्याचा प्रयत्न बेळगाव महानगरपालिकेकडून सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्र चौक हा पहिल्यापासून कर्नाटक सरकारच्या डोळ्यात खुपत आहे. यामुळे या चौकाचे नाव बदलण्यासाठी खटाटोप केला जात असून याविरोधात आंदोलन करणे गरजेचे असल्याचे मत युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी व्यक्त केले. याबाबत महानगरपालिकेमध्ये योग्य तो पाठपुरावा करून नाव अबाधित ठेवण्यासाठी लढा उभारू, असे आश्वासन नगरसेवक रवी साळुंखे यांनी दिले.
हुतात्मा दिनानिमित्त उद्या हुतात्म्यांना अभिवादन,बेळगावमध्ये मूकफेरीचे आयोजन
अन्यायाने बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कानडी प्रांताला जोडण्यात आला. तेव्हापासून आजतागायत सीमाप्रश्नाचा धगधगता अग्निकुंड पेटत आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेकांनी आपल्या जीवाचे रान केले. तर काहींना आंदोलनादरम्यान जीव गमवावा लागला. त्यांच्या स्मृती आजही जपल्या जात आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 17 जानेवारी रोजी संपूर्ण सीमाभागात हुतात्मा दिन पाळला जातो. शुक्रवार दि. 17 रोजी हुतात्म्यांना बेळगावमध्ये अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता हुतात्मा चौक येथे अभिवादन करून त्यानंतर मूकफेरी काढली जाणार आहे. हुतात्मा मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, महादेव बारगडी, लक्ष्मण गावडे, कमळाबाई मोहिते यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. याचबरोबर 8 फेब्रुवारी 1969 रोजी शिवसेनेने 67 हुतात्मे दिले. 1 जून 1986 रोजी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात 9 हुतात्मे झाले. यासर्वांना हुतात्मा दिनी अभिवादन केले जाणार आहे. शहरातील रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसूरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोड येथून पुन्हा हुतात्मा चौक अशा पारंपरिक मार्गाने मूकफेरी काढली जाणार आहे. यावेळी सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. समितीने केले आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी आवाहन
मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. 17 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, तसेच बिंदू चौक येथे हुतात्मा दिन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली जाणार आहे. सर्व सदस्यांनी बेळगावमधील हुतात्मा दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर काकती येथील बर्डे धाब्यानजीक एकत्रित जमायचे असून त्यानंतर सर्वजण कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील. त्यामुळे सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









