हारुगेरी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
बेळगाव : ‘बँकेत तुमच्या नावाने पैसे आले आहेत, ते काढून देतो चला’ असे सांगत महिलांच्या गळ्यातील दागिने पळवणाऱ्या कोल्हापूर येथील अट्टल गुन्हेगाराला हारुगेरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 7 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. एकूण नऊ गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आहे. दस्तगीर गुलाब शेख (वय 38) राहणार कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनवळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रतनकुमार जिरग्याळ, उपनिरीक्षक माळाप्पा पुजारी, शिवानंद कार्जोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. 1 जून 2025 रोजी हिडकल, ता. रायबाग येथील रुक्मव्वा कृष्णाप्पा कांबळे या महिलेने हारुगेरी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. दस्तगीरने रुक्मव्वाला गाठून तुमच्या अळगवाडीतील बँकेत 40 हजार रुपये आले आहेत.
ते मिळवून देतो, असे सांगत दस्तगीरने रुक्मव्वाला आपल्या मोटारसायकलवरून नेले. सैदापूर शाळेजवळ मोटारसायकल थांबवून ‘तुमच्या गळ्यात बोरमाळ असली तर बँकेतील अधिकारी तुम्हाला पैसे देत नाहीत. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. त्यामुळे बोरमाळ काढून माझ्याजवळ द्या. तुमचा फोटो काढल्यानंतर ती तुम्हाला परत करू’ असे सांगत या भामट्याने रुक्मव्वा यांना विश्वासात घेतले. काय घडतेय, हे कळण्याआधीच दस्तगीरने रुक्मव्वा यांची बोरमाळ घेऊन तेथून पलायन केले होते. या प्रकरणाचा तपास करताना दस्तगीरला अटक करण्यात आली आहे. या भामट्याने केवळ हारुगेरीच नव्हे तर तेरदाळ, निपाणी शहर, मुडलगी, कागवाड, अथणी, संकेश्वर, चिकोडी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात अशाच पद्धतीने नऊ महिलांच्या गळ्यातील दागिने पळविल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याने गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल, 65 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 7 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.









