आठ जनावरांचा मृत्यू ;1 लाख 74 हजार लसीकरण
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हय़ात दिवसभरात 20 नव्या जनावरांना लम्पीस्कीनची लागण झाली. यामध्ये 15 गाय तर पाच बैलांचा समावेश आहे. तसेच दिवसात आठ जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला. यामध्ये चार गाय व चार बैलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 1 लाख 74 हजार 743 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
गोवर्गीय पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव वाढत आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे हातकणंगले व पन्हाळा तालुक्यातील अतिग्रे, कबनुर, रांगोळी, तारदाळ, कोडोली आदी पाच ठिकाणी इपीसेंटर स्थापन केली आहेत. इपीसेंटरपासून पाच किमीच्या त्रिज्येमध्ये येणाऱया एकूण 27 गावांमध्ये पशुवैद्यकीय पथकामार्फत उपचार व लसीकरण सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तरी पशुपालकांनी वैद्यकीय पथकास सहाकार्य करावे. नवीन बाधित जनावर आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधवा असे आवाहन डॉ. वाय. ए. पठाण जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जिल्हय़ात मंगळवारी नव्या 20 जनावरांना लंम्पीस्कीनची लागण झाली. तर 128 जनावरांवर उपचार सुरु आहेत. 25 बाधित जनावरे पूर्णतः बरी झाली आहेत. तर आजअखेर एकूण 17 जनावरांचा लंम्पीने मृत्यू झाला आहे. यामध्ये दहा गाय व सात बैलांचा समावेश आहे.









