कोल्हापूर / दीपक जाधव :
प्रशासन आणि नागरिक एकत्र आल्यास काय होऊ शकते, याचं एक उत्तम उदाहरण घरगुती गणपती विसर्जनावेळी पाहायला मिळाले. काही जणांचा हट्ट झुगारून जीवनदायीनी पंचगंगा नदी विसर्जनाविना स्वच्छ ठेवली. नागरिकांनी 10 वर्षांपूर्वी सुरू केलेले ‘मिशन पंचगंगा प्रदूषणमुक्त’ यंदाही जपले गेले. जिह्यात पावणे तीन लाखांहून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन पार पडले.
जिह्यात मंगळवारी 5 दिवसांच्या गणपती बाप्पाला गौरीसह अतिशय भक्तिमय वातावरणात निरोप दिला. विशेष बाब म्हणजे या वर्षी विसर्जनात कोल्हापूरकरांची एकता दिसून आली. यावर्षी पंचगंगा दुथंडी वाहत होती तर कोल्हापूरकर नागरिक अख्ख्या महाराष्ट्राला एक नवीन शिकवण घालत होते.
यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्यमहोत्सव म्हणून मान्यता दिल्याने. भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दहा वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी पर्यावरणपूरक विसर्जन सुरू आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून ‘आमच्याच सणामुळे फक्त प्रदूषण होत नाही, त्याला अनेक कारणे आहेत, तर नदीत विसर्जनाचे आदेश आहेत, असा मुद्दा उपस्थित केला. तसेच नदी परिसरात बॅरिकेट्स काढून बंद केलेले मार्ग जमावाने काढले. याआधी सर्व कोल्हापूरकर गणेशमूर्तींचं विसर्जन नदीमध्ये करायचे. मात्र दहा वर्षांपासून हेच कोल्हापूरकर विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने तेही महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या वतीने तयार केलेल्या कुंडात करतात. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास महत्व दिले. यासाठी महानगरपलिका, जिल्हा परिषद, पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्था एकवटल्या. जिल्हा परिषदेकडे 2 लाख 90 हजार 748 मूर्तींचं संकलन झाले. तर काही जणांनी घरातच विसर्जन केले. यामुळे काही प्रमाणात का होईना पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यात कोल्हापूरकरांना यश आले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत जमा झालेल्या मूर्ती इराणी खणीत सोडण्याचे काम मनपा कर्मचारी करत होते.
आता महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलावाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी पुढे यावे आणि प्रदूषित करणाऱ्या घटकांवर त्वरित कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत जलप्रदूषण थांबवावे, अशी मागणी कोल्हापूरकर करत आहेत. लोकांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, आता जबाबदारी आहे ती महापालिका अन प्रदूषण नियंत्रण मंडळाची?
- आजपर्यंत जि. प. कडे झालेले मूर्ती व निर्माल्यदान
वर्ष घरगुती मूर्ती सार्व. मूर्ती एकूण मूर्ती घंटागाडी ट्रॉली
2015 182442 0 182442 0 916
2016 235889 0 235889 0 1322
2017 246942 0 246942 192 1148
2018 268144 798 268942 260 1100
2019 233950 2969 236919 246 1245
2020 231544 5861 237405 194 1123
2021 242191 3046 245237 289 1460
2022 271449 2590 274039 575 1251
2023 279723 2810 282533 214 1424
2024 290068 2418 292486 230 1392
2025 290196 552 290748 226 1305
एकुण 2772538 21044 2793582 2426 13686
- आज पर्यंत महापालीकेकडे झालेले मूर्तीदान
वर्ष एकुण मुर्ती
2021 53146
2022 51668
2023 57436
2024 57572
2025 60341








