‘भारत जोडो’ यात्रेत कोल्हापूरकर जल्लोषात सहभागी : काँग्रेसचे नेते राहूल गांधींनी अनुभवली कोल्हापूरी संस्कृती
प्रतिनिधी/कोल्हापूर
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत कोल्हापूर जिह्यातील दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते जल्लेषात सहभागी झाले. अपार उत्साहाने भरलेल्या वातावरणात शनिवारी सकाळच्या सत्रातील हिंगोली जिह्यातील प्रवासाचा टप्पा पार पडला. भगवे फेटे, लेझीम, कुस्तीचे प्रात्यक्षिक यामुळे या यात्रेत शनिवारी ठळकपणे कोल्हापुरी बाणा दिसून आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या सुक्ष्म नियोजनाचे यात्रेतील सहभागी असलेल्या देशभरातील कार्यकर्त्यांनी देखील कौतुक केले. या यात्रेत राहुल गांधी यांना छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा भेट देऊन सन्मान करण्यात आला. शाहूंचा पुतळा आपल्या गाडीत ठेवण्याच्या सूचना देऊन त्यांनी शाहूंचा विचार ताकदीने पुढे नेण्याची ग्वाहीच दिली.
‘नफरत छोडो, भारत जोडो’ या संकल्पनेतून सुरू असणाऱया या यात्रेत कोल्हापूर जिह्याचा समतेचा, पुरोगामीत्वाचा वसा घेऊन काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले. शनिवारी हिंगोली जिह्यातील आखाडा बाळापूर ते शेवळगाव या मार्गावर सकाळी साडेसहा वाजता ही यात्रा सुरू झाली. तत्पूर्वी सकाळी पाच वाजल्यापासून या मार्गावर दुतर्फा कोल्हापूर जिह्यातील कार्यकर्ते भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. या बरोबर कोल्हापुरी संस्कृतीचे मानचिन्ह असणाऱया घुमके, लेझीम, मर्दानी खेळ यामुळे वातावरणात उत्साह संचारला होता. फेटय़ांमुळे ‘भारत जोडो’ यात्रेचा परिसर यावेळी चैतन्याने भारलेला होता.
आखाडा बाळापूर येथे यात्रा सुरू होऊन काही अंतरावर यात्रा आल्यानंतर खासदार राहुल गांधी यांचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या हस्ते महालक्ष्मीची मुर्ती देवून स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, राजू बाबा आवळे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष गुलाबराव घोरपडे, प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, सूर्यकांत पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, अमर पाटील-कोडोली, राहुल खंजिरे, राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुल गांधी याना पाहताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आले उधाण
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, ऋतुराज पाटील, वर्षा गायकवाड , प्रज्ञा सातव, तेजस पाटील सर्वात पुढे चालत होते. यात्रेच्या दुतर्फा भगवे फेटे परिधान करून उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांमुळे कोल्हापूरचे वेगळेपण ठळकपणे जाणवत होते. राहुल गांधी सुद्धा हात उंचावून या सर्वांना अभिवादन करत होते. त्यांना एवढय़ा जवळून पाहायला मिळाल्याने सहभागी कार्यकर्ते खुष झाले. तसेच राहुल गांधी यांनी यात्रेसोबत चालणारे कोल्हापूरमधील काही कार्यकर्ते, युवक-युवती, युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढले. यामुळे हे सर्वजण भारावून गेले.
कोल्हापूर जिह्यातील काँग्रेस, युवक काँग्रेस आणि सर्व सेलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून या यात्रेत अत्यंत उत्साहाने सामील झालेल्या कोल्हापूर जिह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे, समविचारी व्यक्तींचे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आभार मानले.
यात्रेत दिसली कोल्हापुरी संस्कृती
या यात्रेत कोल्हापूरची संस्कृती दाखविण्यात आली. नेर्ली येथील लेझीम पथकाने आपली कला सादर करून लोकांची मने जिंकली. तसेच मर्दानी खेळाच्या पथकाने वातावरणात जान आणली. अशा प्रकारे या यात्रेत स्थानिक संस्कृती दाखविण्याचा प्रयोग कौतुकास्पद ठरला.
राहुल गांधीनी घेतला कुस्तीचा आनंद
यात्रा मार्गावर राहुल गांधी यांच्यासाठी कुस्तीचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे नियोजन केले होते. स्वतः राहुल गांधी सुरक्षाकडे बाजूला सारत कुस्तीचा खेळ पाहण्यासाठी आखाडय़ात आले. शाहु आखाडय़ाचे मल्ल उपमहाराष्ट्र केसरी उमेश चव्हाण आणि पै. बंटीकुमार यांच्यातील कुस्ती त्यांनी पाहिली. आमदार सतेज पाटील यांनी त्यांना कुस्तीबद्दल माहिती दिली.
अन् राहूल गांधींना बांधला कोल्हापूरी फेटा
आमदार ऋतुराज पाटील आणि तेजस पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा देऊन खासदार राहूल गांधी यांचा सन्मान करण्यात आला. शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी खासदार गांधी यांना कोल्हापूरी फेटा बांधला. यावेळी गिरगावचे माजी सरपंच दिलीप जाधव यांनी केलेली छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषा लक्ष वेधून घेत होती.
आमदार सतेज पाटील यांचे मायक्रो प्लॅनिंग
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या कोल्हापूरातील सर्व कार्यकर्त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था यावर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील बारकाईने लक्ष ठेवून होते. यात्रेपूर्वी कार्यकर्ते राहत असलेल्या सर्व ठिकाणी भेट देऊन त्यांनी या सर्वांना यात्रेत सहभागी होण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शनिवारी सकाळी पाच वाजल्यापासून यात्रा मार्गावर फिरून स्पीकर वरून ते स्वतः कार्यकर्त्यांना सूचना देत होते. रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते उभे राहिल्याने या सर्वांना राहुल गांधी यांना जवळून पाहता आले. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या या सुक्ष्म नियोजनावर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते खुश होते.