महिला हॉकीसाठी भरीव योगदान, 2022 साली भारतीय महिला हॉकी संघातून केले प्रतिनिधीत्व : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चाचा,नेहरू एक्सलन्सी अॅवॉर्डने ऐश्वर्याचा सन्मान, अनेक राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्र व मध्यप्रदेश संघातून खेळल्या
हॉकी खेळणाऱ्या प्रत्येकाच्या हातात एक हॉकी स्टिक असते. त्या स्टिकने जो खेळाडू चेंडूवर नियंत्रण ठेवत ड्रीबल, टॅपिंग (चेंडू स्टीकने जोराने पळवत नेणे), पासिंग, डॉजिंग करत गोल नोंदवतो अथवा गोलसाठी पास देतो तोच खेळाडू प्रेक्षकांच्या चटकण डोळ्यात भरतो. कोल्हापूरची 27 वर्षीय आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ऐश्वर्या राजेश चव्हाण ही त्यापैकीच एक महिला हॉकीपटू. शालेय क्रीडा स्पर्धा ते भारतीय महिला हॉकी संघांत स्थान मिळवण्यापर्यंत तिने मारलेली मजल आदर्शवत आहे. शिवाय भारतीय महिला संघापर्यंत पोहोचण्यापूर्वी ऐश्वयाने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत गेल्या 17 वर्षांपासून खेळताना कन्सिटंसी परफॉमेन्स केला आहे. कन्सिटन्सी परफॉमेंन्सच्या जोरावरच तिने नॅशनल गेम्स व स्कूल गेम्समध्येही महाराष्ट्र व मध्यप्रदेश संघातून खेळतानाच हॉकी इंडिया आयोजित इंडिया कॅम्पमध्ये पाच वेळा स्थान मिळवले होते. नुकत्याच रांचीमध्ये (झारखंड) झालेल्या महिलांच्या एचआयएलमध्येही (हॉकी इंडिया लीग) ती नेटाने खेळली आहे. तिच्या हॉकीतील दैदिप्यमान कामगिरी टाकलेला हा प्रकाशझोत…
ऐश्वर्याच्या घराला मुळातच विविध खेळांचा वारसा लाभला आहे. तिचे आजोबा (कै.) हिंदुराव चव्हाण हे सैनिक होते. ते आपल्या अंगाला तब्बल 36 चाकू बांधून मल्लखांबावर थरारक प्रात्याक्षिके करत होते. 1965 च्या आर्मी मल्लखांब टीममध्येही ते होते. ऐश्वर्याचे वडील राजेश चव्हाण यांनीही तायक्वाँदोत सेंकड डॅन ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. सध्या ते पोलीस खात्यात गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ऐश्वर्याचे चुलते संभाजी चव्हाण यांनी तर तायक्वाँदोत फोर्थ डॅन ब्लॅक बेल्ट मिळवला आहेच, शिवाय ते देशपातळीवरील लाठी स्पोर्टस् ऑर्गनायझेशन इंडियाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. ऐश्वर्याची चुलत बहीण श्रेया चव्हाण ही तायक्वाँदोत भारतातील सर्वात कमी वयाची (6 वर्षे, 6 महिन्याची असताना) थर्ड डॅन ब्लॅक बेल्टधारक खेळाडू ठरली आहे. असा सगळा क्रीडा वारसा घेऊन ऐश्वर्या कोल्हापूर पब्लिक स्कूल शिकत होती. आवडीपोटी तिने हातात हॉकीची स्टीक घेतली. यावेळी ती 7 वर्षाची होती. रोजच्या रोज ती स्कूलच्या मैदानात व ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये सराव करू लागली. सरावात ऐश्वर्याकडील कौशल्य व क्षमता स्कूलचे हॉकी प्रशिक्षक रणजित इंगवले यांना दिली. त्यांनी ऐश्वर्या तरबेज हॉकीपटू बनू शकेल इतकी गुणवत्ता तिच्याकडे आहे असे ऐश्वर्याची आई अनुराधा चव्हाण व वडील राजेश चव्हाण यांना सांगितले. इंगवले यांचे हे सांगणे आई-वडीलांनीही गांभिर्याने घेत तिला हॉकी सरावासाठी जे लागेल ते देण्याची तयारी दर्शवली. येथूनच खऱ्या अर्थाने ऐश्वर्याचा हॉकी प्रवास सुऊ झाला. सराव करताना प्रशिक्षकांकडून मिळालेल्या टिप्सच्या जोरावर तिने हॉकीतील स्कील अंगी बाणविले. यातून ऐश्वर्या हॉकीसाठी किती जिद्दी होती हे ही जाणवते. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या चेअरमन शोभा तावडे यांचेही तिला प्रोत्साहन मिळत राहिले.
तिने सीबीएसईअंतर्गत शालेय 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या विभागीय राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत तिने स्कूल, महाराष्ट्र संघातून प्रतिनिधीत्व करत मैदान गाजवले. इतकेच नव्हे तर तिने 8 वेळा सीबीएसईअंतर्गत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवले. या कामगिरीची गांभिर्याने दखल घेऊन ऐश्वर्याला पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चाचा नेहरू एक्सलंसी अॅवॉडनेही गौरवले. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने वारणानगरातील (ता. पन्हाळा) यशवंतराव चव्हाण कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजच्या संघातूनही तिने महाविद्यालयीन पातळीवरील मुलींच्या हॉकी स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले कॉलेजच्या संघाला आपल्या हिंमतीवर सामनेही जिंकून दिले. त्याची दखल घेऊन तिला पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापिठ संघात स्थान दिले. दरम्यानच्या काळात होत राहिलेल्या सबज्युनिअर, ज्युनिअर मुली व वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघ निवड चाचणीतही तिने परफॉमेन्स दाखवत संघ निवड समितीतील सदस्यांची मने जिंकली. विविध स्पर्धासाठी कन्सिटंसी परफॉमेन्स करणाऱ्या ऐश्वर्याचे महाराष्ट्र संघातील स्थान जणू अनिवार्यच होऊन गेले. ऐश्वर्याने हॉकी इंडिया आयोजित तर 23 सबज्युनिअर, ज्युनिअर मुली व वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. अनेक सामन्यांमध्ये विऊद्ध संघांवर गोल करत महाराष्ट्र संघाला सामने ही जिंकून दिले. त्यामुळे तिची स्कोरर म्हणूनही ओळख बनली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र ज्युनिअर मुलींच्या संघाची 3 वेळा आणि महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाची 2 वेळा कर्णधारपदाची धुराही तिने सांभाळली. शिवाजी विद्यापीठाच्या हॉकी संघाच्या कर्णधारपदाचीही जबाबदारीने ऐश्वर्याने सांभाळली. जबलपूर (मध्यप्रदेश) येथे 32 विद्यापीठांतर्गत झालेल्या हॉकी स्पर्धेतील तिने शिवाजी विद्यापीठ संघातून प्रतिनिधीत्व करताना शानदार खेळ करत उपस्थितांची मने जिंकली. तिच्या खेळाची दखल घेऊनच तिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवले.
2018 साली बीपीएडचे शिक्षण घेण्यासाठी ऐश्वर्याने ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील आयटीएम विद्यापीठमध्ये प्रवेश घेतला होता. तिकडे मोठ्या धाडसाने एकटी राहत आणि शिक्षण घेत घेत विद्यापीठाच्या संघातही स्थान मिळवले. या संघातून तिने विविध स्पर्धाही खेळल्या. परमजीत ब्रार, व वंदना हुके या प्रक्षिक्षकांकडून मिळत राहिलेल्या प्रशिक्षणामुळे ऐश्वर्याचा खेळ आणखी बहरत गेला. झाशी (मध्यप्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ गट महिला हॉकी स्पर्धेत ऐश्वर्या ही आयटीएम विद्यापीठच्या संघातून खेळली. ही स्पर्धा विद्यापीठ संघाला जिंकून देण्यात तिचाही वाटा राहिला. आयटीएम विद्यापीठच्या संघाने खेलो इंडिया राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ही सुवर्णपदक जिंकले आणि हेही सुवर्ण पदक जिंकून देण्यात ऐश्वर्याचाही मोलाचा वाटा राहिला. या स्पर्धांमध्ये केलेल्या कौशल्यपूर्ण खेळाची दखल घेऊन हॉकी इंडियाने तिची 60 जणींच्या भारतीय संभाव्य महिला हॉकी संघात निवड केली. बेंगळूरात संभाव्य संघाच्या झालेल्या शिबिरातही ऐश्वर्याने डॉजिंग, पासिंग, टॅपिंग आणि ड्रीबलिंगचे कौशल्य दाखवून भारतीय संघ निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. समितीनेही तिच्याकडील कौशल्याला दाद देत तिची 33 जणींच्या भारतीय संघात निवड केली. यानंतर तिची 22 जणींच्या भारतीय संघात केली. या संघाने एफआयएच हॉकी प्रो-लीग 2021-22 अंतर्गत हॉलंडविऊद्धचा सामना खेळला.
आक्रमक चाली आणि वेगवान पासिंगमध्ये माहिर असलेली ऐश्वर्याने संपूर्ण सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने हॉलंडवर 2-0 गोलफरकाने विजय मिळवला. जमेची बाजू म्हणजे सामन्यात ऐश्वर्याने भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला होता. या पेनल्टी कॉर्नरमधून भारतीय संघाने हॉलंडवर पहिला गोल केला. शिवाय संपूर्ण सामन्यात ऐश्वर्याने उत्कृष्टरित्या पासिंग व डॉजिंग कऊन हॉलंड संघातील खेळाडूंवर छाप पाडली होती. स्पर्धेनंतरही आगामी काळात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मनिषा बाळगून तिने सराव सुऊ ठेवला. हा सराव तिला हॉकी इंडियाच्या वतीने सध्या रांची व ओडीशामध्ये आयोजित केलेल्या महिलांच्या चार संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या एचआयएलमध्ये (हॉकी इंडिया लीग) खेळण्यासाठी उपयोगी पडला. ऐश्वर्याला चार संघांपैकी एक असलेल्या जिंदाल स्टील वर्क्स सुरमा क्लबच्या संघात दिल्लीमध्ये झालेल्या ऑक्शनद्वारे स्थान दिले. तिला क्लबमध्ये घेताना मागील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत केलेल्या उत्तम खेळाचा विचार केला.शिवाय तिच्याकडील कॅपॅब्लिटीची कदर करत तिला 2 लाख 10 हजार ऊपये मानधनही जाहीर केले. सध्या हरिद्वार (उत्तराखंड) येथे सुऊ असलेल्या नॅशनल गेम्समधील हॉकी स्पर्धेतही ती मध्यप्रदेश संघातून खेळत आहे. ऐश्वयाची जमेची बाजू म्हणजे आजवरच्या कारकिर्दीत शेकडो स्पर्धेतील काही अपवाद वगळता ती सर्वच्या सर्व सामने खेळली आहे. इतकेच नव्हे तर तिला ऐश्वर्याला खेळाच्या जोरावरच रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आहे. ती सध्या कपूरतला (पंजाब) येथील कार्यालयात अकाउंटट म्हणून सेवाही बजावत आहे. तिच्या या सगळ्या देदिप्यमान कामगिरीमागे प्रशिक्षक परमजित ब्रार, वंदना हुकेई, हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्ष सुरेखा पाटील, विजय साळोखे (सरदार), प्रशिक्षक मोहन भांडवले व रणजित इंगवले यांचे मार्गदर्शन खऱ्या अर्थाने दडले आहे.
-संग्राम काटकर








