कोल्हापूर / संग्राम काटकर :
देशात सुरु असलेल्या उच्च व राष्ट्रीय दर्जाच्या यूथ आयलिग (17 वर्षाखालील मुले) फुटबॉल स्पर्धेमधील साखळी सामने कोल्हापुरातील 2 खेळाडू गाजवत आहेत. पृथ्वीराज पाटील (रा. फुलेवाडी) व रोनित जाभळे (रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंची नावे आहेत. हे दोघेही पुण्यातील स्पोर्टस् मॅनिया फुटबॉल क्लबच्या संघातून यूथ आयलिगमध्ये खेळत आहे. क्लबने आयलिगमध्ये आजवर खेळलेल्या साखळी 10 सामन्यांमध्ये पृथ्वीराजने सहा गोल नोंदवण्याची किमया केली आहे. त्याचे हे गोल्स क्लबला सामने जिंकून देण्यासाठी कामी आले आहेत. युथ आयलिगमध्ये क्लबकडून डिफेन्सला खेळत असलेल्या रोनितनेही प्रतिस्पर्धीने संघाच्या चाली हाणून पाडण्याची कामगिरी केली आहे.
सेंट झेविअर्स हायस्कूलमधून फुटबॉल करीअरची सुऊवात केलेल्या पृथ्वीराजने फुटबॉलचे आधुनिक धडे नामवंत आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू निखिल कदम यांच्या एन. के. फुटबॉल अॅकॅडमीतून घेतले आहे. मैदानात स्ट्रायकर या प्लेसवऊन खेळताना पृथ्वीराजने अनेक सामन्यात जोमदार खेळ केला आहे. त्याच्याच जोरावच त्याला पुण्यातील क्रीडा प्रबोधनीत निवासी पद्धतीने फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला आहे. महाराष्ट्र हायस्कूलमधून फुटबॉलच्या करिअरला सुऊवात केलेल्या रोनित जांभळेने डिफेन्सचा एक चांगला खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली. रोनितच्या खेळावर खुष झालेले हायस्कूलचे क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे यांनी त्याला फुटबॉलचे आणखी प्रशिक्षण देऊन जोमदार डिफेन्सचा खेळाडू बनवले.
पृथ्वीराज व रोनितकडील फुटबॉल कौशल्य उजेडात येण्यासाठी युथ आयलिग फुटबॉल स्पर्धा कारणीभूत ठरली आहे.
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) ऑक्टोबर 2024 मध्ये युथ आयलिग फुटबॉल स्पर्धा जानेवारीपासून सुरु होत असल्याचे जाहीर केले. या स्पर्धेत जो क्लब इफ्राट्रक्चरच्या पातळीवर एआयएफएफच्या निकषात बसतो तोच क्लब युथ आयलिगमध्ये स्थान मिळवू शकतो असा एआयएफएफचा हेका आहे. पुण्यातील स्पोर्टस् मॅनिया फुटबॉल क्लबने एआयएफएफचे सर्व निकष पूर्ण करुन युथ आयलिगमध्ये स्थान मिळवले. नोव्हेंबर महिन्यात क्लबने संघ निवड चाचणी घेतली. पृथ्वीराज पाटील व रोनित जांभळे यांच्यासह अनेक चांगले खेळाडू चाचणीत सहभागी झाले. पृथ्वीराज व रोनितने आपल्याकडील फुटबॉल कौशल्य दाखवून स्पोर्टस् मॅनिया क्लबच्या संघात स्थान मिळवले. जानेवारीमध्ये युथ आयलिग फुटबॉल स्पर्धेचा किकऑफ झाला. गेल्या तीन महिन्यात स्पर्धेच्या एच गटातून स्पोर्टस् मॅनिया क्लबने 10 सामने खेळले. यापैकी पहिल्याच सामन्यात स्पोर्टस् मॅनिया क्लबने मुंबईतील ऑरेंज एफसी संघाला 2-1 गोलफरकाने पराभूत केले. क्लबच्या विजयासाठी पृथ्वीराजने केलेला दुसरा गोल निर्णायक ठरला होता. राजस्थानमधील राजस्थान युनायटेड एफसी विऊद्धच्या सामन्यातही पृथ्वीराजने एकमेव गोल करत स्पोर्टस् मॅनिया क्लबला विजयी केले. या सामन्यामध्ये बचावपटू रोनितनेही गोल नोंदवण्यासाठी प्रतिस्पर्धी संघांनी केलेल्या चाली रोकून धरण्याची खंबीर कामगिरी केली आहे. याचबरोबर पुढील सामन्यांमध्येही पृथ्वीराजने शानदार खेळाचे प्रदर्शन करत राजस्थानमधील झिंक फुटबॉल अॅकॅडमी, गुजरातमधील आरा एफसी, सीव्हीएम एफसी या संघांवर गोल नेंदवत स्पोर्टस् मॅनिया क्लबच्या विजयाला हातभार लावला. जमेची बाजू म्हणजे पृथ्वीराज व रोनितने केलेल्या बहारदार खेळामुळे स्पोर्टस् मॅनिया क्लबचा संघ स्पर्धेच्या फायनल राऊंडमध्ये दाखल झाला आहे. या राऊंडमध्ये देशातील 24 संघांचा सहभाग असणार आहे.
- प्रशिक्षकांचाही मोठा वाटा…
स्पोर्टस् मॅनिया क्लबमध्ये कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू निखील कदम हे सहायक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी आयलिग, इंडियन सुपर लीग फुटबाल स्पर्धेत मोहन बगान, नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी, मुंबई एफसी यासह विविध संघातून प्रतिनिधित्व केले आहे, त्यांनी संघाच्या कामगिरीबद्दल सांगितले की युथ आयलिग स्पर्धेत प्रथमच खेळत असलेल्या स्पोर्टस् मॅनिया क्लबची समाधानकारक कामगिरी आहे. स्पर्धेतील 10 पैकी सहा सामन्यात विजय मिळवून क्लबने आपली काबिलियत सिद्ध केली आहे. क्लबच्या या यशात प्रशिक्षक परेश शिवलकर, कुणाल सावंत, अनिल डिसोझा, यांचाही मोठा वाटा आहे.








