प्रतिनिधी,कोल्हापूर
कतारमध्ये फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा ऐन रंगात आली असताना कोल्हापूरमध्ये वर्ल्डकप फिव्हर आहे.अशा फुटबॉलमय वातावरणात 10 डिसेंबरपासून कोल्हापूरच्या नव्या फुटबॉल हंगामाला प्रारंभ होत आहे.याआधी 4 डिसेंबरला केएसए ए डिव्हिजन स्पर्धेने हंगाम सुरू होणार होता.पण फुटबॉल संघांच्या विनंतीनंतर केएसएने शनिवार 10 डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्याची अधिकृत घोषणा बुधवारी केएसएचे मानद सरचिटणीस माणिक मंडलिक यांनी केली.
याआधीच्या नियोजनानुसार रविवार 4 डिसेंबर रोजी केएसएस ए डिव्हिजन स्पर्धेने नव्या हंगामाला सुरूवात होणार होती.पण डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धा सुरू होणार आहे.या स्पर्धेत स्थानिक संघातील अनेक फुटबॉलपटू सहभागी झाले आहेत. त्यामुळे हंगामाची सुरूवात 10 डिसेंबरपासून करावी, अशी विनंती फुटबॉल संघांनी मंगळवारी केएसएत झालेल्या बैठकीत केली होती. त्यांच्या विनंतीला मान देत केएसएने रविवार 10 डिसेंबरपासून स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला.
केएसए अ डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेत 16 संघांनी नोंदणी केली. या सर्व संघांचे एकूण 348 फुटबॉलपटू नोंदणी केलेले आहेत. त्यामध्ये परदेशी 24 आणि भारतातील इतर राज्यातील 21 आणि कोल्हापूर जिल्हय़ातील 303 फुटबॉलपटूंचा समावेश आहे. सिनिअर सुपर-8 आणि सिनिअर -8 अशा दोन गटातर्गंत 56 सामने होणार आहेत. दररोज शाहू स्टेडियमवर दोन सामने खेळविले जातील.
फुलेवाडी,संध्यामठ अ आणि शिवाजी खंडोबा अ यांच्यात लढत
केएसए ए डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला पहिल्या दिवशी शनिवार 10 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरूद्ध संध्यामठ तरुण मंडळ अ यांच्यात तर दुपारी 4 वाजता शिवाजी तरुण मंडळ विरूद्ध खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यात लढती होणार आहेत. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
Previous Articleझुआरी पुल डिसेंबर अखेरीस खुला
Next Article ऐच्छिक एचआयव्ही टेस्ट करणाऱ्यांत वाढ









