कोल्हापूर :
कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चप्पलने पुन्हा एकदा जागाचे लक्ष वेधले आहे. इटलीतील लक्झरी ब्रँड प्राडाने या पारंपरिक चप्पलची हुबेहूब डिझाइन कॉपी करून बाजारात आणली, त्यानंतर कोल्हापुरी चप्पलवर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष केंद्रित झाले.
विशेष म्हणजे युनायटेड किंगडम (यूके) मध्ये अनेक नामांकित फॅशन स्टोअर्समध्ये आता कोल्हापुरी चप्पल दिसून येत आहे, आणि ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.
कोल्हापुरी चप्पल आणि चामडी बॅग यासारख्या पारंपरिक व हस्तकला उत्पादनांना युनायटेड किंगडममध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचा ट्विटर) खात्यावर ही माहिती दिली असून, यामुळे कोल्हापूरसह देशभरातील हस्तकला, वस्त्र, आणि चर्म उत्पादनांमध्ये गुंतलेल्या कुटुंबांना नव्या आशा मिळाल्या आहेत.
या निर्णयामुळे स्थानिक कारागीर, विशेषत: चर्मकार समाजातील कुटुंबांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. त्यांनी बनवलेल्या वस्तूंना आता थेट युके बाजारपेठेत प्रवेश मिळेल, तोही कोणताही आयात कर न भरता. त्यामुळे या उत्पादनांची स्पर्धात्मक किंमत राखता येणार असून जागतिक ब्रँडशी स्पर्धा करत त्यांची विक्री वाढण्यास मदत होईल.
- यूकेसोबतचा व्यापार करार कोल्हापुरी चप्पल व चामडी उत्पादनांना ‘शुल्कमुक्त प्रवेश‘
केंद्र सरकारने यूकेसोबत केलेल्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत (एफटीए) कोल्हापुरी चप्पल आणि चामडी उत्पादनांना यूके बाजारपेठेत ड्युटी फ्री (शुल्कमुक्त) प्रवेश मिळणार आहे. या निर्णयाचा थेट फायदा कोल्हापुरातील महिला व कुटुंबपद्धतीने चालण्राया कारागीर गटांना होणार आहे. या चप्पला केवळ सौंदर्यदृष्ट्या खास नाहीत, तर त्या टिकाऊ, हस्तनिर्मित आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहेत.
- स्थानिक कारागीरांना मिळणार चालना कोल्हापुरची सांस्कृतिक ओळख आता जगभर
या निर्णयामुळे स्थानिक उत्पादनांना चालना मिळेलच, पण त्याचबरोबर ब्रँड ओळख वाढवणे, सांस्कृतिक वारसा जपणे, आणि पर्यावरणपूरक निर्यातीला बळकटी मिळेल. विशेषत: कोल्हापुरी चप्पल या पारंपरिक उत्पादनाची ओळख आता फक्त महाराष्ट्रापुरती व देशापूरती मर्यादित न राहता, जागतिक फॅशन ब्रँडच्या तुलनेत उभी राहण्याची क्षमता ठेवते, हे सिद्ध झाले आहे.
- जिल्ह्यातील कारागीरांना आता मिळणार जागतिक व्यासपीठ
कोल्हापूर जिह्यातील शिरोळ, कागल, हातकणंगले, राधानगरी यांसारख्या भागांमध्ये कोल्हापुरी चप्पल तयार करण्राया शेकडो कुटुंबांचा यामध्ये सहभाग आहे. महिलांची भूमिका विशेष महत्त्वाची असून, त्यांची कुशल हस्तकला व काटेकोर शिल्पकौशल्य या व्यवसायाचा आत्मा मानले जाते. नव्या करारामुळे याच कारागिरांनी तयार केलेल्या चप्पला आता थेट लंडनसारख्या बाजारात विकल्या जातील.
- कराराचा फायदा इतर राज्यातील उत्पादनांनाही
या कराराचा लाभ फक्त कोल्हापुरी चप्पलपुरता मर्यादित नाही. वाराणसीच्या लूम्स, हैदराबादच्या डिजिटल लॅब्स, आणि राजस्थानमधील कारागीर क्लस्टर्स यांना देखील यूके मार्केटमध्ये अधिक संधी मिळणार आहेत. ही एक व्यापक योजना असून, संपूर्ण भारतातील स्थानिक उत्पादक व कारागिरांना ती जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
- कोल्हापुरी चप्पल कारागीरांचा सन्मान
कोल्हापुरी चप्पल ही केवळ एक पादत्राण नव्हे, तर भारताच्या हस्तकलेचा ठसा असलेले एक वैश्विक प्रतीक आहे. नव्या करारामुळे आणि आंतरराष्ट्रीय डिझायनर ब्रँड्समुळे ती जागतिक पातळीवर झळकू लागली आहे. यामुळे कोल्हापुरातील पारंपरिक कारागीरांना स्थिर रोजगार, चांगला मोबदला, आणि त्यांच्या कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल मिळणार आहे.
-अनिल डोईफोडे, चप्पल व्यावसायिक, कोल्हापुर








