चेन्नईवरुन चामडे आणण्याचा खर्चही अधिक आहे
By : इंद्रजित गडकरी
कोल्हापूर : कधी काळी कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरात हातावर चामडी कमावण्याचा पारंपरिक उद्योग मोठ्या प्रमाणात होता. तो गेली 25 वर्षे संपूर्णपणे बंद असून याचा थेट फटका कोल्हापुरी चप्पलला बसला आहे. कारण व्यावसायिकांना चामड्यासाठी चेन्नईवर अवलंबून राहावे लागत आहे.
चेन्नईवरुन चामडे आणण्याचा खर्चही अधिक आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम कोल्हापुरी चप्पलच्या दरावर होत आहे. प्राडाने कोल्हापुरी चप्पलची नक्कल केली. त्यामुळे या व्यवसायावर टाकलेला हा प्रकाश. जवाहरनगरात 30 ते 35 मोठे व 10 ते 15 छोटे कारखाने होते. या कारखान्यातून कोल्हापुरी चप्पलसाठी लागणारे चामडे मोठ्या प्रमाणात बनत होते. त्याची किंमतही कमी असायची.
परंतु 1999 ते 98 पासून या परिसरातील सर्व कारखाने एकामागोमाग बंद झाले. त्यामुळे कोल्हापुरातील चप्पल कारागिर आणि व्यावसायिकांना चेन्नईवरुन चामडे आणायला लागत आहे. याचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलचे दरही सध्या वाढत आहेत.
प्रदूषणाच्या अफवेमूळे उद्योग बंद
हा व्यवसाय बंद होण्यामागे प्रदूषणाच्या गैरसमजुतीचे मोठे कारण आहे. काही स्थानिकांनी चामडी कमावण्याच्या कारखान्यामुळे नदीचे प्रदूषण होते असा आरोप या कारागिरांवर केला होता. त्यानंतर कारागिरांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे तक्रार केली होती.
जोशींनी प्रत्यक्ष कारखान्यांना भेट दिली. काही लोकांनी वास येतो, घाण होते, वॉटर पोल्यूशन याचा मूद्दा उपस्थित केला. परिणामी महापालिकेने कारखान्यांचे नळ कनेक्शन बंद केले आणि हा उद्योग बंद पडला. मनोहर जोशी यांनी त्रास होणाऱ्या नागरिकांना स्थलांतर करायला सांगितले होते पण काळाच्या ओघात त्याकडे दूर्लक्ष होत गेले.
पूर्वी दररोज 150 ते 200 चामडी तयार होत होती
जवाहरनगरातील कारखान्यांमध्ये दररोज सूमारे 150 ते 200 चामडी कमवली जायची. आज त्या प्रमाणात स्थानिक उत्पादन न झाल्याने, बाजारात दर्जेदार चामडी मिळवणे कठीण झाले आहे. याचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर आणि किंमतीवर होत आहे.
सरकारकडे जागा व सवलतींची मागणी
चर्मकार समाजाने सरकारकडे मागणी केली आहे की आम्हाला दोन ते तीन एकर जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ते पुन्हा पारंपरिक चामडी कमावण्याचा उद्योग सूरू करू शकतील. त्याचबरोबर कायद्यामध्ये शिथिलता आणावी, टॅक्स सवलती द्याव्यात व पर्यावरणाच्या नावाखाली उगाच अडथळे निर्माण होउढ नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात.
कारागिरांवर अन्याय झाला
कारखान्यांमध्ये वापरले जाणारे साहित्य आयुर्वेदिक, नैसर्गिक होते. या कारखान्यांमुळे नदीचे कोणतेही प्रदूषण होत नव्हते. मात्र महापालिकेने पाणी बंद केल्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. स्वत:च्या भांडवलावर काम करणाऱ्या कारागिरांवर हा अन्याय झाल्याची भावना कारागिरांमधून व्यक्त होत आहे.
गावठी चामडे कोल्हापुरी चप्पल करण्यासाठी चांगले
गावठी चामडे म्हणजे हाताने कमावलेले चामडे चप्पल करण्यासाठी उत्तम असते हीच चामडी कोल्हापुरी चप्पलसाठी सर्वाधिक योग्य आहेत. हे चामडे लवचिक, टिकाउढ आणि नैसर्गिक असल्यामुळे त्याची चप्पल चांगली तयार होते. उलट चेन्नईवरून येणाऱ्या चामड्याचा उपयोग फॅन्सी वस्तू करण्यासाठी जास्त होतो. जसे की पर्स, बेल्ट इत्यादी. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलच्या दर्जावरही परिणाम होत आहे.
जुने दिवस परत आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा
सरकारने आम्हाला जागा आणि मूलभूत सुविधा दिल्यास आम्ही आमच्या भांडवलातून कारखाने उभे करू. कोल्हापुरी चप्पल हे केवळ उत्पादन नाही ती कोल्हापूरच्या संस्कृतीची ओळख आहे. हा वारसा जपायचा असेल तर जुने दिवस परत आणण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी.








