अनुकंपा तत्वावरील 62 उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण
कोल्हापूर / प्रतिनिधी
सामान्य माणसांप्रती आत्मियता बाळगा, आपल्याकडे येणाऱ्यांचे काम त्वरीत करुन त्याला कामातून दिलासा द्या, सर्वसामान्यांशी आदरपूर्वक वागा, ज्यांच्यामुळे आपणास शासकीय सेवा मिळाली आहे, त्यांना विसरु नका, लोकाभिमुख होण्याबरोबरच पालकांचीही काळजी घ्या, असा प्रेमाचा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा परिषद येथे अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश वितरण कार्यक्रमात दिला.
जिल्हा परिषदेमार्फत अनुकंपा तत्वारील 62 कर्मचाऱ्यांना आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश वितरीत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्यासह, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, माजी सभापती रसिका पटील यांच्यासह जिल्हा परिषदेमधील अधिकारी, कर्मचारी व अनुकंपा तत्वारील नियुक्ती मिळालेले कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपले कर्तव्य बजावताना सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवावे. ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कामाबाबत समाधान वाटावे, अशी सेवा करा. जिल्हा परिषदेमध्ये आपणास शासकीय सेवा करण्याची संधी मिळाली असून या संधीचे सोने करुन जिल्हा परिषदेचा नाव लौकिक वाढविण्यास आपलाही हातभार असावा या पद्धतीने सर्वांनी काम करावे. कोरोनामुळे भरती प्रक्रिया बंद होती, त्यामुळे ग्रामीण भागापर्यंत सेवा देण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागला. नजिकच्या काळात जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत भरती करण्यात येणार असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये सेवा बजावत असताना आपल्या पालकांच्या निधनाने आपल्या कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खातून आपल्याला सावरता यावे, आपली आर्थिक कुचंबना होऊ नये यासाठी आपणास अनुकंपा तत्वानुसार नेमणूक देण्यात येत आहे. नेमणुकीच्या ठिकाणी प्रमाणिक सेवा बजावून सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य द्या. हयात असलेल्या आपल्या पालकांची काळजी घेण्याबरोरबच कुटुंबातील इतर सदस्यांचीही काळजी घ्या, असेही पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीमध्ये वरिष्ठ सहायक (लिपीक) 2, आरोग्य सेवक (पु)-9, कनिष्ठ सहायक (लिपीक) -12, कनिष्ठ सहायक (लेखा)- 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-4, कनिष्ठ अभियंता स्थापत्य-3, ग्रामसेवक-5, पर्यवेक्षिका-1 आणि 23 उमेदवारांना परिचर पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी आभार मानले.