जि.प.चे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांचा कमवा आणि शिका योजनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम
कोल्हापूर प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले होते. त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने गुणवंत आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये 3 वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याचे आणि पदवी नंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान-कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध देण्यात येणार आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सर्व्हीस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याना विद्यावेतन देण्याची नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती जि.प.चे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
या योजनेअंतर्गत विद्यार्ध्यांना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी 8 हजार रूपये, दुसऱ्या वर्षी 9 हजार व तिसऱ्या वर्षासाठी 10 हजार रूपये इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या निवास आणि भोजनाचा खर्च भागविण्यासाठी मदत म्हणून दरमहा रुपये 4 हजार प्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 3 वर्ष समाधानकारक केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱया वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय बी.बी.ए. सर्व्हीस मॅनेजमेंट ही कामातून पदवी आणि 3 वर्ष शासकीय काम केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे.
जिल्हयातील ग्रामीण भागातील गुणवंत व होतकरुन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासक चव्हाण यांनी केले आहे.









