विभागीय स्तरावर गडहिंग्लज पंचायत समितीला द्वितीय क्रमांक
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून देण्यात येणार्या ‘यशवंत पंचायत राज अभियान 2022-23’ या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर द्वितीय क्रमांक कोल्हापूर जिल्हा परिषद व तृतीय क्रमांक लातूर जिल्हा परिषदेला मिळाला आहे. तसेच विभागीय स्तरावर गडहिंग्लज पंचायत समितीला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
या अभियानांतर्गत राज्यातील अत्युत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा व तीन पंचायत समित्यांना पुरस्कारासाठी राज्यस्तरावर निवडण्यात येते. तसेच विभागस्तरावर तीन पंचायत समित्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. या पुरस्कारांच्या निवडीसाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पारितोषिक निवड समिती स्थापन करण्यात आली होती. विभागस्तरीय मुल्यांकन समितीने शिफारस पेलेल्या प्रत्येक विभागातून प्रथम आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची राज्यस्तरावऊन क्षेत्रीय स्तरावर पडताळणी करणे आवश्यक होते. त्यासाठी राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयांची अदलाबदल कऊन क्षेत्रीय पडताळणी करण्याच्या सुचना विभागीय आयुक्त कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांकडून पंचायत राज संस्थांचे क्षेत्रीय पडताळणी अहवाल शासनाला प्राप्त झाले होते. राज्यस्तरावर अत्युत्कृष्ट पंचायत राज संस्थांची निवड करण्यासाठी राज्यस्तरीय मुल्यांकन समितीची 22 मे 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यस्तरीय पारितोषिक निवड समितीने राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून प्राप्त झालेल्या अहवालाची तपासणी केली. त्यानंतर अत्युत्कृष्ट तीन जिल्हा परिषदा व तीन पंचायत समित्यांची निवड करण्यात आली. याबाबतचे शासन निर्णय ग्रामविकास विभागातर्फे काढण्यात आला.









