जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी : राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीचा परिणाम : 2 खासदार, 2 आमदार सांभाळणार शिंदे गटाची धुरा : जनसुराज्य शक्ती पक्ष भाजपसोबतच : काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना स्वबळ आजमावणार ? : शिवसेनेचे माजी आमदार अद्यापही संभ्रमामध्ये
कृष्णात चौगले/कोल्हापूर
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत होत असून ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षामध्ये अंतर्गत पातळीवर जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील राजकीय घडमोडींचा जिह्याच्या राजकारणावरही मोठा परिणाम झाला आहे. शिवसेनेचे दोन खासदार व दोन आमदार शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे आगामी जि.प.च्या निवडणुकीत अन्य राजकीय पक्षांबरोबरच भाजपसोबत गेलेल्या शिंदे गटाची भर पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा देणाऱया काँगेस, राष्ट्रवादीकडून स्वबळ वाढवण्यासाठी परफेक्ट नियोजन सुरू आहे. राजकारणात कधी कोणाचा मित्र नसतो, आणि शत्रूही नसतो, याची जाणीव ठेवून त्यांची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ‘सोय पाहून तडजोड’ होणार, हे मात्र नक्की.
आमदार हसन मुश्रीफ यांची ताकद पणाला
करवीर, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, कोल्हापूर उत्तर, दक्षिण या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद क्षीण झाली आहे. कुरघोडीच्या राजकारणामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेनेचा आधार घेतला. परिणामी 2017 च्या निवडणुकीमध्ये जि.प.मधील संख्याबळ 16 वरून 11 पर्यंत खाली आले. सध्या राष्ट्रवादीकडे सहकारी संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व दिसत असले तरी त्यांनी इतर पक्षांचा टेकू घेतला आहे. त्यामुळे भविष्यातील वाटचालीमध्ये राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी आमदार मुश्रीफ यांनी ताकद पणाला लावली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांची ताकद वाढली असून त्यांच्याकडून मुश्रीफ यांना कडवा विरोध होणार आहे.
‘हात’ बळकटीकरणासाठी होणार ‘सतेज’ प्रयत्न
आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा स्विकारल्यापासून अस्तित्वहिन काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आले आहेत. विधान परिषद, शिक्षक मतदारसंघ, गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या राजकारणात यश मिळवल्यानंतर आमदार पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतून लढवल्या असल्या तरी आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होईल का? याबाबत अनिश्चितता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळ आजमावण्याबाबत सूचना आहेत. त्यामुळे जि.प.गटनिहाय कोणते आरक्षण पडले तर उमेदवार कोण असावा, याचे पक्के नियोजन माजी पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार सतेज पाटील व पी.एन.पाटील यांच्यामधील तात्वीक मतभेद दूर झाल्यामुळे काँग्रेसची ताकद निश्चितपणे वाढली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा जिल्हा कॉंग्रेसवर कोणताही ‘साईड इफेक्ट’ होणार नसल्याचे चित्र आहे.
पन्हाळा-शाहूवाडीत शिवसेना, जनसुराज्य आमने-सामने
गोकुळबरोबरच जिल्हा बँकेतही निर्णायक स्थान निर्माण केलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीचीही तयारी केली आहे. त्यांचे पारंपारिक विरोधक शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचाही या मतदारसंघात सक्षम गट आहे. त्यामुळे जि.प. निवडणुकीमध्ये या दोन पक्षांमध्येच प्रमुख लढत होणार आहे. आपले प्राबल्य टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही येथे ताकद पणाला लावली जाणार आहे. आमदार मुश्रीफ येथे किती ताकद लावतात ? यावर राष्ट्रवादीचे राजकारण अवलंबून आहे.
हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस, सेना अन् जनसुराज्यची ताकद
विधानसभेला पराभव झाल्यानंतर माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकरांचा गट काहीअंशी पिछाडीवर होता. त्यानंतर डॉ.मिणचेकरांनी गोकुळमध्ये एंट्री केल्यामुळे या गटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. त्यामुळे आमदार राजूबाबा आवळे यांच्यापुढे पुन्हा डॉ. मिणचेकर यांचे तगडे आव्हान असणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या दोन गटांमध्येच फाईट होणार आहे. खासदार धैयैशील माने व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा स्वतंत्र शिंदे गट मैदानात येणार असल्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात बहुरंगी निवडणुकीची शक्यता आहे. परिणामी गतनिवडणुकीत भाजप व जनसुराज्यचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात जनसुराज्य, काँग्रेस व शिवसेनेबरोबरच शिंदे गटाचेही प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे.
इचलकरंजीमध्ये आवाडे गटाचा ‘मास्टर प्लॅन’
इचलकरंजी मतदारसंघामध्ये हातकणंगले तालुक्यातील 11 पैकी 5 जि.प.गटांचा समावेश आहे. यापैकी 2017 च्या निवडणुकीमध्ये ताराराणी आघाडीच्या माध्यमातून 2 ठिकाणी आवाडे गटाचे वर्चस्व होते. आता आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्व गटांमध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. राज्यात आमदार आवाडे भाजपसोबत असल्यामुळे जि.प.निवडणुकीत ते कमळ हाती घेणार की पुर्वीचा ताराराणी आघाडीचा फॉर्म्युला वापरणार, हे गुलदस्त्यात आहे. आवाडेंचे राजकीय धोरण कोणतेही असले तरी दोन्ही काँग्रेससह मूळ शिवसेनेसमोर त्यांचे तगडे आव्हान आहे.
शिरोळमध्ये स्वाभिमानी, शिदे गट, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये लढाई
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करताना मतदारसंघात अनेक विकासकामे खेचून आणली. आता ते शिंदे गटासोबत गेल्यामुळे पुन्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. त्यामुळे सद्यस्थितीत शिरोळमध्ये त्यांचा भक्कम गट आहे. येथे माजी आमदार उल्हास पाटील किती ताकदीने उतरतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा तालुका म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ‘होम पिच’ आहे. काँग्रेसचे अस्तित्वदेखील कायम आहे. त्यामुळे येथे शिंदे गट, मूळ शिवसेना, स्वाभिमानी आणि काँग्रेसमध्येच प्रमुख लढत होणार आहे.
राधानगरी मतदारसंघात आमदार आबिटकर, के.पी.पाटील आमनेसामने
आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे राधानगरी मतदारसंघामध्ये शिंदे गट, मूळ शिवसेना, राष्ट्रवादी आणि केंग्रेस हे प्रमुख पक्ष जि.प.च्या मैदानात दिसणार आहेत. जि.प.निवडणुकीचे राजकारण पाहता आमदार आबिटकर व माजी आमदार के.पी.पाटील म्हणजेच शिंदे गट आणि राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. येथे राष्ट्रीय काँग्रेस किती ताकदीने उतरणार, यावर येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तर स्थानिक आघाडय़ांचे ‘सुरक्षा कवच’
मिनी मंत्रालयाची निवडणूक म्हणजे विधानसभेची ‘लिटमस टेस्ट’ आहे. साहजिकच आपल्या मतदारसंघाचा गड भक्कम करण्याकडे प्रत्येक नेत्याचे ‘लक्ष्य’ आहे. त्यामुळे गोकुळसह जिल्हा बँक निवडणुकीत एकत्र आलेले नेते जि.प. निवडणुकीत परस्परविरोधात दिसणार आहेत. दुसऱया फळीतील कार्यकर्त्यांची राजकीय सोय करण्यासाठी आणि त्यातून आपली ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक नेत्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना जेथे पक्षीय बंधन अडसर ठरेल, तेथे स्थानिक आघाडय़ांचे सुरक्षा कवच बाहेर काढले जाणार आहे.









