पुलाची शिरोली /प्रतिनिधी
येथील दिग्विजय शंकर पाटील या क्रिकेट खेळाडूची १९ वर्षाखालील भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वडील शंकर परशराम पाटील हे पुणे येथील एका नामांकित कंपनीत अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा मुलगा दिग्विजय हा पुणे येथे शिक्षण घेत आहे. त्याला क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याचे वडील शंकर पाटील यांनी शिक्षणा बरोबर क्रिकेट खेळात दिग्विजयकडे अधिक लक्ष दिले आहे.
नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या विनू मंकड करंडक क्रिकेट स्पर्धेत दिग्विजय पाटील यांनी महाराष्ट्र संघातून सर्वोत्कृष्ट फलंदाजी करुन सर्व सामन्यात सरासरी ८१ धावांच्या सरासरीत ६८१ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके व एक अर्धशतक नोंदवले आहे. तसेच त्याने हा चषक जिंकून देण्यासाठी मोठी कामगिरी बजावली आहे.
यामुळे दिग्विजय ची १९ वर्षाखालील भारतीय संघात निवड झाली आहे. त्यास बीसीसीआयकडून मानाची असणारी कँप प्रदान करण्यात आली आहे. त्याच्या या कामगिरीने पुलाची शिरोलीचे नांव संपूर्ण देशात पोहचवले असून त्याचे शैक्षणिक, क्रिडा, राजकीय व सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे.









