कुटुंबीयांनी दुःख सावरून केला अर्जुनचे नेत्रदान
वाकरे : प्रतिनिधी
खुपिरे (ता. करवीर) अर्जुन निवृत्ती पाटील (वय ४० ) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.सोमवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली.मात्र अर्जुनच्या कुटुंबीयांनी कुटुंबावर झालेला आघात बाजूला ठेवून त्याचे नेत्रदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि अर्जुनच्या नेत्ररुपी स्मृती कायम ठेवल्या.
या आत्महत्येबाबत घटनास्थळ व करवीर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्जुन पाटील हा वडिलोपार्जित शेती करत होता. सोमवारी पहाटे पाच वाजता तो शेताकडे जातो म्हणून बाहेर पडला. शेताकडे गेलेला अर्जुन उशिरापर्यंत घरी आला नाही. दरम्यान त्याचे चुलते ज्ञानदेव पाटील हे शेताकडे गेले. त्यावेळी त्यांना अर्जुनने त्यांच्याच शेतातील झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती घरच्यांना दिली. पोलिसांनी पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठवले. अर्जुनच्या जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पण या धक्क्यातून सावरत त्यांनी त्याचे नेत्रदान करण्याचा सामजिक निर्णय घेतला आणि नेत्रदान केले. त्याच्या मागे पत्नी, आई, भाऊ, चुलते, मुलगा असा परिवार आहे.