कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर रेंगाळलेले नवीन तसेच विस्तारित प्लॅटफॉर्मचे काम
बाळासाहेब उबाळे / कोल्हापूर
कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर 2019 पासून नवीन चार प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम सुरु आहे. या कामाची मुदत 2022 अखेर पर्यंत आहे. आजअखेर हे काम पूर्ण झाले असते पण दोन वर्षाचा कोविडचा कालावधी आणि अन्य कारणामुळे हे काम रेंगाळले. यामुळे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. अजूनही या कामाला गती नाही. यामुळे वर्षअखेरीस काम पूर्ण होईल का नाही याबाबत शंका व्यक्त होत आहेत. मात्र काम पूर्ण होऊन प्लॅटफॉर्म तयार झाल्यास येथून 30 डब्यांची गाडी सुटणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे.
रेल्वेच्या प्रश्नाकडे सर्वांचे दुर्लक्ष
कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील अनेक कामे व प्रश्न प्रलंबित आहेत.या प्रश्नाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. यामुळे कामे रखडली जात आहेत.
नवीन प्लॅटफॉर्ममुळे जादा डब्यांची गाडी थांबणार
प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्याने त्या प्लॅटफॉर्मवर 30 डब्यांची गाडी लागू शकते. तसेच एखाद्या गाडीला जादा डबे जोडता येऊ शकतात. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
सद्या महालक्ष्मी एक्स्प्रेस सर्वाधिक 22 डब्यांची गाडी
कोल्हापूर रेल्वे स्थानकातून धावणाऱया रेल्वे गाडय़ापैकी सर्वाधिक महालक्ष्मी एक्स्प्रेसला सर्वाधिक 22 डबे आहेत. अन्य गाडय़ांना 19 किंवा 20 डबे आहेत. 660 मीटरचा प्लॅटफॉर्म तयार झाल्यावर त्या प्लॅटफॉर्मवर 30 डब्यांची गाडी थांबू शकते.
महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल
सद्या शाळा बंद आहेत. यामुळे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढली आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसचे जूनच्या दुसऱया आठवडय़ापर्यंतचे बुकिंग फुल्ल आहे. यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसने मुंबईला जाऊ इच्छिणाऱया किंवा मुंबईवरुन कोल्हापूरला येऊ इच्छिणाऱया प्रवाशांना आरक्षण मिळत नाही. आरक्षणासाठी ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे. तत्काळसाठीही खासदार, आमदार यांचे पत्र लागते. यामुळे प्रवासी लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवत आहेत. लोकप्रतिनिधींच्या कार्यालयातूनही रोज शेकडो पत्रे दिली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे तिकिट कोणाला देणार असा प्रश्न आहे. त्यापेक्षा महालक्ष्मी एक्स्प्रेसला आणखी दोन जादा डबे जोडण्याची गरज आहे किंवा सुटीसाठी नवीन गाडी सुरु करावी अशी रेल्वे प्रवाशांची मागणी होत आहे.
प्लॅटफॉर्मच्या कामासाठी रेल्वे प्रशानाकडून प्रतिसाद नाही
कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मचे काम सुरु झाले होते. पण कोविडमुळे दोन वर्षे रखडले. त्यामुळे ठेकेदाराने काम अर्धवट सोडले होते. आता पुन्हा काम सुरु असले तरी रेल्वे प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाने वेळच्या वेळी निधी उपलब्ध करावा. सर्व प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यास येथून आणखी नवीन रेल्वे सुरु होण्यास संधी आहे.
शिवनाथ बियाणी, सदस्य, मध्य रेल्वे पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समिती