धोकादायक इमारत म्हणून कुळ वापरातील घर पाडल्याचा आरोप : अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ; अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला
कोल्हापूर प्रतिनिधी
बिंदू चौक सबजेल समोरील आझाद गल्लीतील धोकादायक इमारत म्हणून वापरातील घर पाडल्यावरून शुक्रवारी कुळ ज्योती सचिन जानवेकर यांनी महापालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे महापालिकेत खळबळ उडाली. अग्निशमन दलाचे जवान वेळीच आल्याने अनर्थ टळला. दरम्यान, जागा मालकाने बिंदू चौक परिसरात भाड्याने खोली देण्याचे मान्य केल्यानंतर वादावर पडदा पडला.
बिंदू चौकातील सब जेल समोरील आझाद गल्लीतील घर नंबर 554 या मिळकतीमध्ये जाणवेकर कुटूंबिय कुळ म्हणून 70 वर्षापासून राहत आहेत. 2013 मध्ये मनपाने ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस दिली होती. यावर न्यायालयात जागा मालक आणि जाणवेकर यांच्यात वादही सुरू होता. 5 जुन 2021 रोजी महापालिकेने धोकादायक म्हणून जाणवेकर राहत असलेले घर पाडले. तेव्हापासून जाणवेकर कुटूंबिय महापालिकेत येवून यासंदर्भात जाब विचारत आहेत. सचिन जाणवेकर पत्नी ज्योती आणि तीन मुलांसह सोमवारी दुपारी 2 च्यासुमारास महापालिकेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना भेटण्यासाठी आले होते. मनपाच्या फेऱ्या मारूनही न्याय मिळत नसल्याने मनपा चौकात ज्योती जाणवेकर यांनी काडपेटीतील काडी पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी मनपातील अग्निशमन दलातील जवानांनी त्यांच्याकडून काड्यापेटी काढून घेतली. यानंतर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे त्यांना नेले.
यावेळी ज्योती जाणवेकर म्हणाल्या, घर पाडल्यापासून राहण्यास निवारा नाही. नातेवाईकांच्या घरामध्ये राहून दिवस काढत आहे. भाड्याने दुसरीकडे राहण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत घर पाडलेल्या ठिकाणी शेड मारून राहण्यास परवानगी मिळावी. अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी अशी परवानगी दिली जात नसल्याचे सांगितले. यावर जोपर्यंत निवाराची सोय होत नाही तोपर्यंत मनपातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका जाणवेकर कुटूंबियांनी घेतली. याच दरम्यान, ज्योती जाणवेकर चक्कर येवून कोसळल्या. अखेर घर मालकाने पर्यायी ठिकाणी भाड्याने राहण्याची सोय करण्याची ग्वाही दिल्याने वातावरण शांत झाले.









