महावितरणचे काम करणारे ठेकेदार हवालदिल : 2019 व 2021 मधील कामांची बिले प्रलंबित : स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने ठेकेदार त्रस्त : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी/कोल्हापूर
2019 आणि 2021 या दोन वर्षात जिह्यात आलेल्या महापूरामुळे नदी काठावरील वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. हजारो वीज खांब जमीनदोस्त होऊन वीज वाहक तारा तुटल्या होत्या. यावेळी महावितरणची कामे करणाऱया ठेकेदारांनी आपल्या कुशल मनुष्यबळाच्या आधारे अवघ्या काही दिवसांत कोलमडलेली वीज यंत्रणा पुन्हा उभारुन वीज पुरवठा सुरळीत केली. पण अनेक ठेकेदारांना या दोन्ही वर्षातील कामांचे बिल महावितरणने अदा केलेले नाही. त्यामुळे या ठेकेदारांची अर्थिक कोंडी झाली आहे. स्थानिक पातळीवरील अनेक अधिकाऱयांच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदार त्रस्त्र झाले असून केलेल्या कामाचे बिल मिळणार कधी ? असा संतप्त सवाल ठेकेदारांतून उपस्थित केला जात आहे.
2021 च्या महापूरात कोल्हापूर, सांगलीची 35 हून अधिक उपकेंद्रे बाधित झाली होती. वीजवाहिन्या, वितरण रोहित्रे पाण्यात गेली. वीज खांब पडले. 315 गावे, 4 लक्ष 27 हजार ग्राहकांच्या वीजपुरवठ्य़ावर त्यांचा परिणाम झाला. या संकटकालीन स्थितीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिह्यातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी स्थानिक स्तरावर आपत्कालीन नियोजन करण्यात आले. जिह्याचे वाहतूक मार्ग बंद असताना उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळाच्या आधारे मोठय़ा कौशल्याने वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला. 2019 च्या महापुरामध्येही महावितरणचे वीज कर्मचारी आणि ठेकेदरांच्या मुनष्यबळाचा वापर करून वीज ग्राहकांना अंधारातून तत्काळ प्रकाशात आणले. या दोन्ही महापूरात कोलमडलेली वीज यंत्रणा उभारण्यामध्ये ठेकेदारांचा सिंहाचा वाटा आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्या कर्मचाऱयांनी ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे स्थानिक नागरीकांनी अनेक ठेकेदारांचा सत्कार करून त्यांचे कौतूक देखील केले. पण दोन्ही महापूर कालावधीत केलेल्या कामाचे बिल मिळाले नसल्यामुळे ठेकेदार मात्र चिंतातूर बनले आहेत.
पश्चिम पन्हाळ्यातील कामांच्या बिलासाठी प्रतिक्षा
विशेषतः पन्हाळा पश्चिम भागात महापूरातील कामाचे बिल महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे सादर केल्यानंतर त्यांनी ठेकेदाराने दिलेल्या बिलात लाखो रूपयांची कपात केली आहे. एका बाजूस कामाच्या बिलासाठी दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागत असताना पुन्हा दिलेल्या बिलात कपात केल्यामुळे ठेकेदार अर्थिक अरिष्टात सापडणार आहेत. विशेष बाब म्हणजे आपल्या आप्तेष्टातील ठेकेदाराने कमी काम करून देखील त्याचे मोठे बिल संबंधित अधिकाऱयाने महावितरणकडे सादर केले आहे. या अधिकाऱ्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही त्यांच्याकडून कामाचे बिल महावितरणकडे सादर करण्याची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे संभाव्य महापूर कालावधीत काम करायचे की नाही असा प्रश्न ठेकेदारांसमोर निर्माण झाला आहे.