विनोद सावंत, कोल्हापूर
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या महिन्याभरापासून पाणी गळती काढण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये प्राधान्य क्रमाने मोठया गळती काढल्या जात आहेत. आतापर्यंत प्रमुख 6 ठिकाणीची गळती काढली असून रोज 22 एमएलडी (220 लाख लिटर) वाया जाणारे पाणी रोखण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले आहे. यामुळे काही परिसरातील पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.
कोल्हापूर महापालिका पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेऊन त्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करून शहरातील नागरिकांना वितरित करते.वास्तविक महापालिका हा विभाग ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर चालवित आहे.असे असतानाही नागरिक पाण्याचे बिल वेळेवर जमा करत नाहीत.गत आर्थिक वर्षात पाणीपुरवठा विभागाचे 72 कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट असताना 51 कोटींची वसुली झाली.पाणी बील बुडविणारे आणि पाणी चोरीमुळे पाणीपुरवठा विभाग तोट्यात आला आहे. यामध्ये पाणी गळतीने भरच पडली आहे.उपसा केंद्रातून रोज 198 एमएलडी (10 लाख लिटर म्हणजे 1 एमएलडी) इतक्या पाण्याचा उपसा होतो. मात्र, 58 एमएलडी पाण्याचेच बिलींग होते.उर्वरीत पाणी गळती आणि चोरी होते असल्याचे वॉटर ऑडीटमध्ये स्पष्ट झाले आहे.
पाणीपुरवठा विभागाने शहरात 15 मोठ्या गळती काढण्याचे टार्गेट ठेवले आहे.येथून रोज लाखो लिटर पाणी वाया जाते.या गळती काढल्यास पाणीपुरवठा विभागावरील अतिरिक्त खर्चात बचत होऊन तोटाही कमी होण्यास मदत होणार आहे.शिवाय गळतीतून वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करता येणार असल्याने नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.यामुळे पाणीपुरवठा विभागाने मोठ्या गळती काढण्यास प्राधान्य दिले असून विशेष मोहीम राबविली जात आहे. महिन्याभरात सहा मोठ्या गळती काढल्या आहेत.या दरम्यान,नागरिकांना पाणी मिळाले नसल्याने त्रास झाला असला तरी रोज 22 एमएलडी गळतीतून वाया जाणारे पाणी रोखण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले.
25 वर्षाची गळती काढली
कळंबा फिल्टर हाऊस येथील गळती 25 वर्षापासूनच होती.गळती काढण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने कोणी गळती काढण्याचे धाडस करत नव्हते.नेत्रदीप सरनोबत जल अभियंतापदी नियुक्त झाल्याने त्यांनी मोठी गळती काढण्याचे काम अजेंड्यावर घेतले.त्यानी कळंबा फिल्टर येथील गळती,पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील 10 वर्षापासून असणारी गळती काढली.तसेच बालिंगा फिल्टर हाऊस येथून तासाला 2 लाख लिटर वाया जाणारे पाणी पंपींग हाऊसकडे वळवले.
पुईखडीतील 10 एमएलडी वाया जाणारे पाणी रोखले
पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून रोज 10 एमएलडी पाणी वाया जात होते.येथील पाणी परिसरातील कॉलनीमधील इमारतीच्या बांधकामासाठी वापरले जात होते.या पाण्यावर एकाने टोलेजंग इमारत उभारली.पाणीपुरवठा विभागाने येथील गळती काढल्याने संबंधितास बोअर मारावी लागली आहे.
ठिकाण रोज होणारी गळती
कळंबा तलाव 48 लाख लिटर
कळंबा फिल्टर 24 लाख लिटर
बालिंगा उपसा केंद्र 48 लाख लिटर
पुईखडी जलशुद्धीकरण केंद्र 100 लाख लिटर (10 एमएलडी)
पुष्कराज तरूण मंडळ परिसर 2 लाख लिटर
राजेंद्रनगर मुख्य लाईन 1 लाख लिटर
नदीतून रोज पाणी उपसा-198 एमएलडी
पाणी गळती-138 एमएलडी
पाणी चोरी-1.73 एमएलडी
पाण्याचे बिलींग -58 एमएलडी
गळतीमुळे पाणी शुद्धीकरण, वीज बीलावरील खर्च वाया जातो. तसेच पाणीपुरवठ्यावरही परिणाम होतो. त्यामुळेच गळती काढण्यास प्राधान्य दिले आहे. 15 मोठ्या गळत्यापैकी 6 गळत्या काढल्या आहेत. पुढील टप्प्यात आयटीआय परिसर, श्री लॉन आणि कसबा बावडा फिल्टर येथील गळती काढली जाणार आहे.
नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता, महापालिका
Previous Articleमोरेवाडीतील मुख्य चौक अंधारात, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
Next Article डेगवे- पानवळ रस्ता पहिल्याच पावसात खचला !









