कसबा बीड
करवीर तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. कसबा बीड परिसरामध्ये शिरोली दुमाला, केकतवाडी , धोंडेवाडी , गणेशवाडी , या भागामध्ये ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. यापैकी केकतवाडी या गावची ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. गेली चार-पाच दिवस सुरू असलेल्या या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणा आज थंड झाल्या व एकदिवशीय छुप्या प्रचाराला सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे.
शिरोली दुमाला व गणेशवाडी येथे परंपरागत विरोधी पक्षांमध्ये असणाऱ्या स्थानिक आघाडीमध्ये मिलाफ झाला आहे. शिरोली दुमाला येथे गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वासराव पाटील व कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्रामविकास आघाडी पॅनेल झाले आहे. या पॅनेलविरुद्ध सरदार पाटील, गजानन सुभेदार आणि इतराच्या नेतृत्वाखाली लोकशाही ग्रामविकास आघाडी पॅनेल व सरपंच पदासाठी अपक्ष अशी लढत होणार आहे. या गावात एकूण 4500 मतदान असून 5 वार्डमध्ये दोन्ही आघाडीचे 15 उमेदवार व सरपंचपदासाठी 3 उमेदवार अशी लढत होणार आहे.
गणेशवाडी येथे कुंभी- कासारीचे संचालक व माजी सरपंच दादासो लाड व माजी पोलीस पाटील राणोजी माने यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा ग्राम विकास आघाडी पॅनेल झाले आहे. तर विरोधी आघाडीमध्ये नामदेव एकल व इतर यांच्या नेतृत्वाखाली भावेश्वरी ग्रामविकास आघाडी पॅनेल अशी लढत होणार आहे. गणेशवाडीमध्ये एकूण 1653 मतदान असून 3 वॉर्डमध्ये दोन्ही आघाडीतून 18 उमेदवार व सरपंच पदासाठी 1 अशी लढत आहे. यामध्ये वॉर्ड 3 मध्ये एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे .
धोंडेवाडी येथे स्थानिक दोन आघाड्या झाल्या असून त्यामध्ये भिकाजी नलवडे यांच्या नेतृत्वाखालीश्री शंभू महादेव ग्राम विकास आघाडी व पांडुरंग नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शिवशंभो ग्राम विकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.धोंडेवाडी येथे एकूण 550 मतदान असून 3 वॉर्ड आहेत.दोन्ही आघाडी मधून 14 उमेदवार रिंगणात असून सरपंच पदासाठी 2 उमेदवार अशी लढत आहे.
एकंदरीत प्रत्येक गावामध्ये स्थानिक आघाड्या विधानसभा व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचे चित्र डोळ्यांसमर ठेवून निर्माण झाल्या आहेत असल्याचे दिसून येते. या अगोदर एकमेकांना केलेली मदत व सद्यस्थिती असणारे वास्तव व भविष्यात होणाऱ्या निवडणुका यांमधून काही ठिकाणी चुरशीचे तर काही ठिकाणी संमिश्र अशी लढत आहे.