युवराज भित्तम, म्हासुर्ली
Kolhapur News : धामणी खोऱ्यातील प्रमुख मार्ग असलेल्या कळे ते म्हासुर्ली प्र.जि मार्ग क्रमांक २६ वरील पन्हाळा तालुक्यातील वेतवडे ते पणोरे दरम्यान कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेल्या ३ किमी अंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.परिणामी अवघ्या दोन महिन्यांतच रस्त्यावरील खडी उखडली गेल्याने वाहने घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत.तसेच बांधलेल्या मोऱ्या ही खचल्या असल्याने अपघातास निमंत्रण मिळत असून गगनबावडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेतून संताप व्यक्त होत असून चौकशीची मागणी होत आहे.
शासन दरवर्षी ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करण्यासाठी दरवर्षी कोट्यावधीचा निधी खर्च करत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते चकाचक होऊ दळणवळण वेगवान होत आहे.
मात्र धामणी खोऱ्यातील प्रमुख असलेल्या कळे-म्हासुर्ली मार्गावरील वेतवडे ते पणोरे (ता.पन्हाळा) दरम्यानच्या ३ कि मी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.एप्रिल -मे महिन्या दरम्यान सदर रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.मात्र डांबरी मिश्रित बीसीचा थर मुर्ग नक्षत्राच्या पहिल्या पावसात निखळून पडल्याने सध्या रस्त्यावर वाळू मिश्रित खडीचा थर साचला आहे.परिणामी या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.तर निखळून पडलेल्या बारीक खडीवरून सध्या वाहने घसरून लहान-मोठे अपघात घडत असल्याने जनतेला या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहेत.
कळे – म्हासुर्ली मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असून पणोरे येथे महाविद्यालय असल्याने अनेक विद्यार्थी -विद्यार्थिनी याच मार्गावरून दररोज प्रवास करत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.तर सदर रस्त्याच्या रुंदीकरण,साईट पट्या खुदाईसह इतर कामकाज पूर्णता चुकीच्या पद्धतीने झाले असून या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात व सदर कामाची चौकशी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
कामाची चौकशी करावी..!
रस्त्याच्या साईट पट्ट्यांचे काम योग्य असे केलेले नाही.. तसेच पाण्याचा कमी वापर केला असून डांबरीकरणाचा थर निकृष्ट झाला आहे. त्यामुळेच अवघ्या दोन महिन्यात पावसाने रस्त्यावरील खडी उखडली आहे.त्याचा त्रास सामान्य नागरिकांना बसत असून लहान मोठे अपघात घडत आहेत. या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. तरी सदर कामाची खातेनिहाय चौकशी करावी.
– बाजीराव केसरकर,ग्रामस्थ
दुरुस्ती करण्यात येईल..!
ठेकेदाराकडून हे काम व्यवस्थित झाले नसून त्यांचे बिल आम्ही रोखून ठेवले आहे.लवकरच त्यांच्याकडून रस्त्यावर सिलकोट टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल.तसेच सध्या प्राथमिक उपाययोजना म्हणून रस्त्यावरील बारीक उखडलेली खडी हटवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिला आहेत.
– सुरेश सुतार, शाखा अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग गगनबावडा









