ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वाकरे गावावर शोककळा
वाकरे प्रतिनिधी
वाकरे (ता. करवीर) येथे शेतात झेंडूची फुले तोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला गुरुवारी सर्पदंश झाला होता. उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. बाजीराव पांडुरंग लोंढे-चौगले (वय 45) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर गुरुवारी शाळेतील स्वच्छतागृहामध्ये पायावरून साप गेल्याच्या भीतीच्या धक्क्याने एका बालकाचा ताप येऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. अर्णव नवनाथ चौगले (वय 8) असे त्याचे नाव आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ही दुर्दैवी घटना घडल्याने वाकरे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बाजीराव लोंढे-चौगले हे नंबर नावाने परिचित असलेल्या शेतात गुरुवारी पहाटे फुले तोडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना काहीतरी चावल्याचे जाणवले. मात्र एखादा कीटक चावला असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले. प्रत्यक्षात त्यांना विषारी सर्पाने दंश केला होता. काही वेळाने त्यांना त्रास होऊ लागल्याने गुरुवारी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. मात्र रविवारी पहाटे पुन्हा ते अत्यवस्थ झाले यातच त्यांचा मृत्यू झाला. ते केदारलिंग पाणीपुरवठा संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दुसऱ्या घटनेत गुरुवारी अर्णव नवनाथ चौगले हा वाकरेतील एका खासगी शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होता. मधल्या सुट्टीत तो बाथरूममध्ये गेला असता त्याच्या पायावरून साप गेला. त्यामुळे तो केवळ सर्पदंश झाल्याच्या भीतीने घाबरला होता. त्याला त्वरित उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र या बालकाला सर्पदंश झालेला नसतानाही केवळ धक्का बसल्याने त्याचा ताप मेंदूपर्यंत पोहोचल्याने तो अत्यवस्थ झाला. त्याला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र सर्पदंशाच्या भीतीच्या धक्क्यातून तो बाहेरच येऊ शकला नाही आणि यातच रविवारी सायंकाळी अर्णवचा मृत्यू झाला.









