कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाच्या दूहेरीकरणाकडेही वेधले लक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर-वैभववाडी प्रदिर्घकाळ रेंगाळलेल्या रेल्वेमार्गासाठी तत्काळ निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाच्या दूहेरीकरणासाठीही निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी राज्यसभेत केली.
खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवार 30 रोजी राज्यसभेत रेल्वेशी संबंधित मुद्दे उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग सुरू होणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर आहे, मात्र त्याला गती मिळालेली नाही. व्यापार, कृषी, उद्योग आणि पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने कोल्हापूर कोकणला जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी निधीची तरतुद करून, तातडीने कोल्हापूर- वैभववाडी रेल्वेमार्ग अस्तित्वात यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. तसेच कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणे गरजेचे आहे. त्यातून कोल्हापूरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाडयांची संख्या वाढेल. परिणामी रोजगार आणि उद्योग वाढेल, सुरक्षित आणि गतीमान प्रवास होईल. त्यामुळे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठीही तातडीने भरीव निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली.