उत्रे /प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील डोंगर परिसरात वांजळे व दरा शेत परिसरात दहा ते बारा रानडुक्कराच्या कळपाने धुमाकूळ घातला असून डुक्करे हातातोंडाशी ऊस फस्त करत आहेत. सुमारे दहा एकरातील ऊसाचे डुक्कराच्या कळपाने नुकसान केले आहे. नुकसानीचा पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी तसेच या रान डुक्करांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उत्रे निकमवाडी दरम्यान डोंगर परिसरातील वांजुळ माळ- दरा नावाच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून दहा ते बारा रान डुक्कराचा कळपाचा वावर आहे.हा कळप रात्रीच्या वेळी या परिसरातील ऊस फस्त करत आहेत.डुक्करे ऊस निम्म्यातून चघळून टाकतात.यामुळे सुमारे दहा एकर क्षेत्रातील दहा ते बारा शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे.यापूर्वी या परिसरात गव्यांच्या कळपाकडून पिकांचे नुकसान झाले आहे.’ गवे गेले आणि डुक्करे आली ‘ अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा नुकसानभरपाई मिळावी तसेच या डुक्करांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या परिसरात गवे,वानर,मोर, रानडुक्कर आदी वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.









