प्रतिनिधी/ सातारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनी संतोष जगदाळे यांनी 100 किलोमीटरचे अंतर सायकलिंग करून वेगळया पद्धतीने अभिवादन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता त्यांनी पोवई नाका येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन करुन रॅलीला सुरुवात केली. त्यांनी 100 किलोमीटर अंतर पार करुन अभिवादन केले. त्यांच्या या अनोख्या सायकल परिक्रमा करुन राजश्री शाहु महाराजांना अभिवादन करण्याच्या संकल्पनेबाबत त्यांचे कौतुक होत आहे.
संकल्प केला तर तो तडीस नेणे खूप कठीण असते. साताऱयातील संतोष जगदाळे यांनी राजर्षी शाहु महाराजांना 100 किलोमीटर सायकलींग करुन अभिवादन करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी मनाचा निश्चय करुन सायकलिंगला सुरुवात केली. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करुन पुढे राईडला सुरुवात केली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र सचिन, अमोल, फिरोज, दीपक हे आले होते. सातारा-मेढा-केळघर असा रुट त्यांनी निवडला होता. एकेक गाव त्यांनी ओलांडत रस्त्याला अंधाराने गाठले. येणाऱया आणि जाणाऱया वाहनांच्या लाईटाच्या प्रकाशाच्या साथीने त्यांनी केळघरहून सातारा गाठले. त्यावेळी जगदाळे यांना वाटले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढे तर शेकडो वर्षांचा अंधार होता. त्यातून त्यांनी मार्ग काढून आता आपल्याला हा तेजोमय प्रकाश दिला आहे. राहिलेले अंतर त्यांनी साताऱयात पूर्ण केले.
शेवटचे काही अंतर संतोष जगदाळे यांच्या सोबतीला त्यांचा पुतण्या यश होता. तसेच ईशान, शाहू व सुचित्रा यांनी व्हिडिओ कॉल करून त्यांना प्रोत्साहन दिले. पोवई नाका येथे राजधानी सेल्फी पॉईंट येथे संतोष जगदाळे यांनी पोहचून राईड पूर्ण करुन छत्रपती शाहू महाराज अभिवादन केले.









