एका वारांगणेची करूण कहाणी : उमेश निरंकारी आणि वारांगना सखी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार
संजीव खाडे/कोल्हापूर
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ती कर्नाटकातून कोल्हापूरमध्ये आली. तिच्या गावाचे नाव तिने कधीच कुणाला सांगितले नाही. जगण्यासाठी तिने देहविक्रीचा व्यवसाय स्वीकारला. हा व्यवसायच तिच्या पोटपाण्याचा प्रश्न सोडवित होता. हळूहळू ती स्थानिक वारांगनांच्या गर्दीत हरवली. व्यवसाय सुरू होता. तो पुढेही सुरू राहिला. निसर्ग नियमानुसार तारुण्याची जागा प्रौढ वयाने घेतली. तिचा व्यवसाय हळूहळू कमी होऊ लागला. पन्नाशी पालटली आणि तिचा वृद्धाप काळाकडील प्रवास सुरू झाला. व्यवसायातून मिळालेले पोटापुरते होते, त्यामुळे म्हातारपणी काय करायचे याची चिंता तिला चिंतेवर जाईपर्यंत सतावत होती. 30 मे रोजी तिने वयाच्या 58 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आणि तिची जगण्याची चिंता संपली.
ही काही काल्पनिक कथा, कहानी नाही. वास्तवात घडलेली कथा आहे. एखाद्या वारांगणेचा मृत्यु कसा होतो, तो शोकांत असतो, याचे जळजळीत वास्तव सांगणाऱया या सत्य कथेतील वारांगनेचे नाव होते शाला. (बातमीत तिचे मूळ नाव आणि आडनाव बदलले आहे). शाला गेली चाळीस वर्षे देहविक्रीच्या व्यवसायात होती. कर्नाटकातून ती आली तेंव्हा अठरा वर्षांची होती. तिने कधीही आपल्या नातेवाईकांची माहिती दिली नाही. त्यामुळे तिच्या नाव, गावाचा पत्ता कधीच कळला नाही. शाला म्हणूनच तिला नाव आणि ओळख मिळाली. या नावाने तिचा देहविक्रय व्यवसायातील प्रवास सुरू झाला. काळ कुणासाठीही थांबत नाही. शालाचे तारूण्य कालौघात कमी होऊ लागले.
तसा व्यवसायावरही परिणाम होऊ लागला. चाळीशी, पन्नाशी ओलांडल्यानंतर पुढे करायचे काय या चिंतेत रोजचा दिवस काढणाऱया शालाने मिळेल ते काम करत पोट भरण्यास प्रारंभ केला. कुणी नातेवाईक नसल्याने काळजी करणारे आणि काळजी घेणारेही नव्हते. यादव नगरातील एका खोलीत राहणारी शाला काही दिवसांपूर्वी आजारी पडली. निमोनिया झाल्याचे निदान झाले. पण पैसे नसल्याने तीने आजार अंगावर काढला. हळूहळू निमोनियाने डोकेवर काढले. तो बळावला. शालाच्या सेवेला कुणीही नव्हते. अखेर तिने 30 मे रोजी शेवटचा श्वास घेतला.
शालाचे जाणे शोकांत होते. करूण होते. तिला अखेरचा निरोप देण्यात आला. वारांगणा सखी संघटनेच्या पदाधिकाऱयांसह सामाजिक कार्यकर्ते उमेश निरंकारी यांनी पुढाकार घेत शालावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी सुशांत गवळी, शारदा यादव, मंगल गोसावी, शुभम आळवेकर, अजय कांबळे, साहिल शेख, मंदा चव्हाण, संगीता पिराळे, सुरेखा कोळी उपस्थित होते.
भाऊ म्हणून बहिणीला दिला अग्नी
उमेश निरंकारी गेली 15 वर्षे वारांगणांचे भाऊ म्हणून कार्य करत आहेत. त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराविरोधात लढत असतात. वारांगणांकडून राखी बांधून घेण्यासाठी दरवर्षी रक्षाबंधनचा कार्यक्रम राबवितात. शालाच्या मृत्युनंतर तिला निरंकारी यांनी भाऊ म्हणून अग्नी दिला. वारांगणांच्या गर्दीत एकेकाळी हरवून मूळ ओळख विसरून गेलेल्या शालाला मुक्ती दिली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.