कोल्हापूर /प्रतिनिधी; राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त यंदाचा युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा सोमवार 18 रोजी होणाररा रथोत्सव लोकोत्सव व्हावा. भवानी मंडप येथून रात्री साडेआठ वाजता सुरु होणाऱ्या या रथोत्सवामध्ये करवीरकरांनी, तालीम मंडळे, संस्था यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केले.
खासदार संभाजीराजे म्हणाले, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या कार्याची ओळख करवीरच्या जनतेला व्हावी, यासाठी श्री क्षेत्र जोतिबच्या चैत्र यात्रेनंतर दोन दिवसांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1914 सालापासून करवीर संस्थानात शिवराय आणि ताराराणींच्या रथोत्सवाला प्रारंभ केला. शाहू महाराजांनी सुरु केलेली ही पंरपरा आजही जोपासली गेली आहे. मागील काही वर्षांपासून छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून रथोत्सवाची व्याप्ती वाढली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त 18 एप्रिल ते 4 मे दरम्यान विविध उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महाराणी ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची ओळख तरुण पिढीला आणि नागरिकांना करून देण्याची संधी रथोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. रथोत्सवादिवशी पारंपरिक वाद्ये, शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके यासह रथोत्सव मार्गावर प्रबोधनात्मक उपक्रम राबवावेत. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे. दरम्यान, सोमवार, दि. 18 रोजी रात्री 8.30 वाजता भवानी मंडप येथून शिवाजी महाराज-महाराणी ताराराणी रथोत्सवाला प्रारंभ होणार असून बिनखांबी, महाद्वार रोड, गुजरी मार्गे पुन्हा भवानी मंडप येथे रथोत्सवाची सांगता होणार आहे.
Previous Articleइंग्रजांनी इतिहासाचे केले विकृतीकरण
Next Article पाणीपट्टी बिलावर केवळ ‘कॅश पेड’चा शिक्का









