कोलवाळ पोलिस उपनिरीक्षकाकडून संशयित आरोपीस संरक्षण देण्याचा प्रयत्न: पर्यटकांच्या वाहनावर दगडफेक
प्रतिनिधी/ म्हापसा
गोठणीचा-व्हाळ म्हापसा करासवाडा येथे गॅरेजमध्ये पार्क करून ठेवलेली गाडी मागे काढताना झालेल्या हाणामारीत दोघे पर्यटक जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घडली. गणेश वाठारे (वय 45) व आलफे नदाफ (40) अशी जखमी पर्यटकांची नावे असून ते कोल्हापूर येथील नागरिक आहेत. घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपी रशीद सिद्धकी महम्मद (रा. करासवाडा-म्हापसा) याला ताब्यात घेतले आहे. संशयिताने पर्यटकांच्या गाडीवर दगड घातला व गाडीची तोडफोड केली व घटनास्थळी बराच धिंगाणा घालत नंतर बाटली फोडून स्वत:हून जखमी करून घेतले. घटनेची माहिती कोलवाळ पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी जखमींना म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात आणले तर संशयित रशीद सिद्धकी याला जिल्हा आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले.
पर्यटकांना धक्काबुक्की करीत धक्काबुक्कीचे ऊपांतर नंतर हाणामारीत झाले. यात पर्यटक व संशयित आरोपीही बरेच जखमी झाले. रागाच्या भरात संशयित आरोपी रशीद याने भला मोठा दगड पर्यटकांच्या गाडीवर घालून नुकसान केले. पोलिस उपनिरीक्षकांची संशयितास नेताना लपाछपी, पाठीमागच्या दारातून बाहेर कोलवाळ पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक संशयितांना घेऊन म्हापसा जिल्हा आझिलोत आले व संशयितास बराच वेळ जीपमध्ये बसवून ठेवले. जखमी अवस्थेत संशयित जीपमध्ये बाहेर बसून होता व तेथे पोलिस संरक्षण होते. काही पत्रकारांनी त्या घटनेची छबी व व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने पत्रकारांना तेथून जाण्यास सांगितले व येथे काहीच घडले नसल्याची बतावणी केली. इतके कृत्य घडूनही काहीच घडले नसल्याचे सांगून संशयित आरोपी रशीद याला कॅज्युअल्टीच्या मागील दारातून बाहेर काढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी पत्रकारांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता पोलिस आपल्यास नाहक मारहाण करीत असल्याचा आरोप केला. मात्र त्या संशयितास एवढे संरक्षण व इस्पितळाच्या पाठीमागून दारातून नेण्याचे काय काय? हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात होता. पुढील उपचारासाठी पर्यटकांना गोमेकॉत नेण्यात आले आहे.
सिनेस्टाईलने संशयिताच्या भावाचा इस्पितळात हैदोस
घटनेची माहिती संशयित आरोपीच्या भावाला मिळाल्यावर सायंकाळी 6.15 वाजण्याच्या दरम्यान अगदी चित्रपटाला शोभेल असे आपल्या मित्रासमवेत जीए-03-एएक्स-5240 या दुचाकीने इस्पितळात आले. दुचाकीवरून धावत सर्वांना धक्का देत आत कॅज्युअल्टीमध्ये घुसले व आपल्या भावाजवळ जाऊन हैदोस घातला. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करीत पोलिसांना धमकी दिली व बाहेर आले असता उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याकडे आपले कॅमेरा लावले असता एका महिला पत्रकाराच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला व पत्रकारांच्या अंगावर गेला. यावेळी उपस्थित पत्रकार त्यांच्यामध्ये बरीच बाचाबाची झाली व पोलिस व पत्रकारांना शिवीगाळ करीत त्या दुचाकीवरून पळून गेला. मात्र इस्पितळात उपस्थित असलेले पोलिस त्यांच्याकडे नुसते पाहत काहीच करू शकले नाही. तो इसम पोलिसांना धक्काबुक्की व शिवीगाळ करीत निघून गेला. हे सारे दृश्य मात्र तेथील काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये नोंद केले.









