गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना पाण्यासाठी नागरिकांकडून टँकरची शोधाशोध
कोल्हापूर : ऐन गणेशोत्सवामध्ये शहरवासियांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. काळम्मावाडी येथील पंप दुरुस्तीचे काम अद्याप ही सुरु आहे. त्यामुळे बुधवारीही अनेक भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना दुसरीकडे मात्र पाण्यासाठी नागरिकांना टँकरची शोधाशोध करावी लागत आहे.
वारंवार खंडीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमधुन विशेषत: महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. पुणे महापालिकेने क्रोबार असेंबली किट दिले असून रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरु होते. काळम्मावाडी येथील पंपातील व्हीएफडी कार्ड खराब झाल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
मंगळवारी रात्री तिसऱ्या टप्प्यातील टेस्टिंगवेळी आलेला एरर काढून टाकल्यानंतर बुधवारी पहाटे 4.50 वाजता चौथ्या टेस्टिंगदरम्यान पुन्हा एरर आल्याने नियोजित पाणीपुरवठा ठप्प झाला. यामुळे बुधवारीही शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
व्हीएफडी कार्ड दुरुस्तीचे काम सोमवारी रात्रीपासून युद्धपातळीवर सुरू आहे. सलग चार टेस्टिंगदरम्यान आलेल्या एररमुळे महापालिकेच्या सर्व यंत्रणा रात्रभर कार्यरत आहेत. उपायुक्त कपिल जगताप व जल अभियंता हर्षजित घाटगे घटनास्थळी उपस्थित राहून कामकाज पाहत आहेत.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन
पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेच्या तसेच खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. अतिरिक्त टँकरही मागवण्यात आले आहेत. विविध वॉर्डसाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संपर्कासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत.
कळंबा फिल्टर हाऊस अंतर्गत बुधवारी 23 टँकरद्वारे फेऱ्या करुन 3 लाख 50 हजार लिटर पाण्याचा टँकरद्वारे संपूर्ण ए आणि बी वॉर्डमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. यामध्ये मनपाचे तीन खासगी ठेकेदारांमार्फत 14 असे एकूण 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
पंप दुरुस्तीसाठी पुण्याची यंत्रणा
शहरात नागरिकांची पाण्यासाठी सुरु असलेली धावापळ पाहता प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने पुणे महापालिका प्रशासक नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधला. कंपनीकडून आवश्यक पार्ट उपलब्ध न झाल्याने पुणे महापालिकेकडून संपूर्ण क्रोबार असेंबली किट पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. या किटसह पुणे महापालिकेचा तज्ञ तंत्रज्ञही कोल्हापुरात दाखल झाले.
पहाटेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करा : प्रशासक के. मंजूलक्ष्मी
पुणे येथून क्रोबार असेंबली रात्री साडेआठ वाजता काळम्मावाडी येथे दाखल झाली. महापालिकेच्यावतीने ती जोडण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे. दरम्यान रात्री साडेनऊ वाजता प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी येथे जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी पहाटेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
याप्रसंगी रेनबो इलेक्ट्रीकलचे कन्सल्टंट काशिनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टेस्टींगची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. तसेच जेकेसी कंपनीचे माळी यांना नियमित मेंटेनन्स करा, आवश्यक स्पेअर पार्टस ज्यादा प्रमाणात साठवून ठेवावेत, सर्व पंप कार्यरत रहावेत व एक पंप कायम स्टँडबाय स्थितीत असावा अशाही सूचना केल्या.








