हणमंतवाडी/वार्ताहर
शिंगणापूर तालुका करवीर येथे दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी आलेल्या राकेश प्रकाश पोलादी (वय ४० राहणार मार्केट यार्ड) कोल्हापूर याचा नदीत बुडून मृत्यू झाला. शिंगणापूर चिखली बंधाऱ्याजवळ दरवर्षीप्रमाणे नदीवर दसऱ्यानिमित्त मोठे धुणे धुण्यासाठी कुटुंबासह राकेश पोलादे सकाळी दहाच्या सुमारास आले होते. सर्व कपडे धुवून झाल्यानंतर अंघोळीसाठी त्याने पाण्यात उडी मारली असता प्रवाहतील डोहात बुडून त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. राकेश पोलादे एका साप्ताहिकासाठी काम करत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आई असा परिवार आहे.