संग्राम काटकर कोल्हापूर
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवण्याइतकी ऊर्जा कोल्हापुरी खेळाडूंच्या अंगात आहे. पण त्यांच्याकडे सरावासाठीची उपकरणे नाहीत. फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठीच्या टिप्स देणारा फिटनेस ट्रेनर नाही. सामन्यासाठीची मानसिकता तयार करणारा स्पोर्टस् सायकॉलॉजीस्ट नाही, कोणता खुराक घ्यावा हे सांगणार आहारतज्ञ नाही, असे आता घडणार नाही. कारण राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीस वरील सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाने तयार केलेल्या मिशन गोल्ड कोल्हापूर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. खेळाडूंसाठी वरदान ठरणाऱया या योजनेतून ऑलिंपिकमध्ये समाविष्ठ 10 वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी अथवा सहभागी खेळाडूंसह वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना आवश्यकतेनुसार सुविधा मिळणार आहेत.
गेल्या 3 दशकात क्रीडानगरी कोल्हापुरातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. पण नेमबाजी, कुस्ती वगळता अन्य स्पर्धेतील खेळाडूंना पदके मिळवता आली नाहीत. याचा सारासार विचार केला असता सरावासाठी ज्या सोयीसुविधा हव्या असतात, त्याच मिळत नसल्याने खेळाडूंना धमक असूनही पदकापांसून दूर रहावे लागते हा निष्कर्ष पुढे आला. हाच निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवून जून 2021 ला जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी ऑलिंपिकमध्ये समाविष्ठ असलेल्या वरिष्ठ आंतरराष्ट्रीय व वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना सुविधा देणारी मिशन गोल्ड कोल्हापूर ही योजना तयार केली. ही योजना 8 महिन्यांपूर्वी जिल्हा क्रीडा संकुल समिती अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समोर मांडली. त्यांनीही खेळाडूंचे हित लक्षात घेऊन योजनेला मंजुरी देत जिल्हा नियोजन समितीकडून कोटय़वधींचा निधी मिळवून देऊ असे सांगितले होते.
बहुसंख्य देशातील खेळाडूंना फिटनेस ट्रेनर, आहारतज्ञ, फिजिओथेरेपीस्ट, कोच, स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्ट व सोनाबाथ सिस्टीम आदी सुविधा मिळतात. या सुविधांच्या जोरावर खेळाडू ऑलिंपिकपासून जागतिक क्रीडा स्पर्धेत ताकदीने लढून पदके मिळवतात. अशीच पदके कोल्हापूर जिह्यातील खेळाडूंना ही मिळवता यावीत यासाठी मदतीचा हात देणारी मिशन गोल्ड कोल्हापूर ही योजना खेळाडूंसाठी वरदानच ठरणार आहे. अगदी अलीकडेच योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वरिष्ठ आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी अथवा सहभागी खेळाडूंसह वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंकडून अर्ज मागवले होते. अर्जासोबत 2017-18 पासून ते 2021-22 या कालावधीतील वरिष्ठ आंतरराष्ट्रीय व वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकी अथवा सहभागाची माहिती व प्रमाणपत्राच्या सत्यप्रती जोडून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे खेळाडूंनी जमा केली आहे. आता लवकरच अर्जांची छाननी करुन खेळाडूंना सोयी-सुविधा देण्याचे नियोजन केले जाणार आहे.
योजनेसाठी 80 लाखांचा निधी मंजूर…
मिशन गोल्ड कोल्हापूर या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या पैशातून खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षक मिळवून देण्याबरोबरच खुराकासाठी आर्थिक मदतही दिली जाईल. तसेच दर महिन्याला लॅब टेस्ट करुन खेळाडूच्या तंदुरुस्तीचा अभ्यास केला जाईल. खेळाडूंसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवण्यात येईल. योजनेसाठी लागेल तेवढी निधी मिळाल्यास पुढील चार वर्षे तरी योजना सुरु ठेवली जाईल.
डॉ. चंद्रशेखर साखरे (जिल्हा क्रीडा अधिकारी)









