राजकीय समीकरणे बदलणार; पुन्हा आरक्षण जाहीर होणार
जगदीश पाटील गडहिंग्लज
जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आरक्षणात दिग्गजांचा गुल झालेला पत्ता पुन्हा खुलणार आहे. तर काहींना अडचण होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे प्रस्तापित नेत्यांचा वाद संपण्याची चिन्हे असली तरी ‘कभी खुशी कभी गम’ अशी परिस्थती तयारी झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी आरक्षणाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली होती. यावेळी मावळत्या जिल्हा परिषदेच्या हलकर्णी, नेसरी हे दोन मतदारसंघ राखीव झाले होते. त्यामुळे येथील नेत्यांवर निर्वासीत होण्याची वेळ आली होती. तर नूल, भडगाव आणि गिजवणे हे जिल्हा परिषद मतदारसंघ खुले झाल्याने येथे सर्वच पक्षाच्या, गटाच्या इच्छुकांना आनंदाची उकळी फुटली होती. पंचायत समिती आरक्षणामध्येही काहींचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे तेथीलही इच्छुकांची अडचण झाली होती. खुल्या गटात उमेदवारी मिळवण्यासाठी आतापासून चुरस दिसत असतानाच काहींनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढण्याची तयारी केली होती. पण पुन्हा काढण्यात आलेले जिल्हा परिषदेचे आरक्षण रद्द झाल्याने इच्छुकांमध्ये पुन्हा धाकधूक वाढली आहे.
नेसरी आणि हलकर्णी हे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ राखीव झाल्याने अनेकांची अडचण झाली होती. इतर मागास वर्गासाठी नेसरी मतदारसंघ राखीव झाल्यानंतर इतर मागासचे दाखले काढण्यासाठी अलिकडे साऱयांची धावपळ सुरु झाली होती. त्यामुळे कागदांची जमवाजमव केली जात होती. असे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा प्रस्तापित सुखावले आहेत. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी तयारी चालवली होती. पण राज्य शासनाचा निर्णय बुधवारी गडहिंग्लज तालुक्यात समजताच पुन्हा एकदा इच्छुकांची घालमेल सुरु झाली आहे. आरक्षणामुळे परिघाबाहेर गेलेल्या दिग्गजांना पुन्हा नव्या आरक्षणाचा वेध लागला आहे. याची चर्चा तालुक्यात होताना दिसते आहे.
इच्छुक पुन्हा ‘रिचार्ज’
गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 गणाचे आरक्षण झाल्यानंतर काही दिग्गजांची राजकीय अडचण झाली होती. नेसरी, हलकर्णीतील अनेक इच्छुकांचा अर्ज भरण्यापूर्वीच पत्ता कट झाला होता. त्यामुळे त्यांना 5 वर्षे राजकारणापासून बाजूला रहावे लागणार होते. पंचायत समितीच्या गण आरक्षणातही नेसरी, हसुरचंपू, कडगाव येथील खुल्या इच्छुकांची अडचण झाली होती. त्यांनाही या नव्या निर्णयामुळे आरक्षणाची आस लागली आहे.
सौभाग्यवतींसाठी ‘फिल्डिंग’
जिल्हा परिषदेचा हलकर्णी हा मतदारसंघ महिलेसाठी राखीव झाला होता. तर पंचायत समितीचा हसुरचंपू, बसर्गे, हलकर्णी, महागाव, गिजवणे, नेसरी येथे इच्छुकांची अडचण झाल्यानंतर सौभाग्यवतींसाठी ‘फिल्डिंग’ लावली जात होती. नेसरी वगळता अन्यत्र महिला आरक्षणामुळे ही परिस्थती आली होती. सौभाग्यवतीला निवडणूक आखाडय़ात उतरवण्याची तयारी सुरू असताना आरक्षणच रद्द झाल्याने पुन्हा एकदा नव्या आशेने इच्छुकांचे तारखेकडे लक्ष लागले आहे.