नवीन इमारत उभारण्यासाठी १४ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर केला
By : विनोद सावंत
कोल्हापूर : करवीर तहसील इमारतीस निधी मंजूर होऊन साडेतीन वर्ष झाले. अजूनही तळ मजल्याच्या स्लॅब जोडणीचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयाचे काम असूनही या कामासाठी निधी मंजुरीपासून भूमीपूजनापर्यंत अनेक अडथळ्याचा सामना करावा लागला.
सार्वजानिक बांधकाम विभागाने केलेल्या ड्राईंगमध्ये ऐनवेळी बदल केल्याने तळ मजल्याच्या स्लॅबलाही विलंब झाला आहे. सध्या कोणताही अडथळा नसून दीड वर्षात इमारत पूर्ण होईल, असा दावा ठेकेदाराकडून केला जात आहे. शहराच्या मध्यवस्तीमध्ये करवीर तहसील कार्यालय आणि करवीर पोलिस स्टेशनची इमारत होती.
ही इमारत जुनी झाली होती. तसेच दोन्ही कार्यालयासाठी पुरेसे पार्कीग नव्हते. त्यामुळे नव्याने इमारत उभारण्याचा निर्णय तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच तत्कालिन महसूलमंत्री बाळासाहेब बोरात यांनीडी नवीन इमारत उभारण्यासाठी १४ कोटी ९८ लाखांचा निधी मंजूर केला.
येथील पोलिस चौकी कसबा बावड्यात तर करवीर तहसील कार्यालय बी.टी. कॉ लेज येथे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण करून जानेवारी २०२३ मध्ये या कामासाठी वर्कऑर्डर देण्यात आली. वास्तविक यानंतर दीड वर्षात येथे नवीन इमारत उभारून दोन्ही कार्यालय स्ववास्तूत सुरू होणे अपेक्षित होते. परंतू लाल फितीचा कारभार आणि आलेल्या अनेक अडचणीमुळे हे शक्य झालेले नाही.
निधी मंजूर होवून साडेतीन वर्ष झाले तरी चार मजली असणाऱ्या इमारतीचा साधा तळमजल्याचा स्लॅब झालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम सुरु आहे. मूळची इमारत जुनी आणि हेरिटेल होती. यामुळे नव्या इमारतीलाडी हेरिटेज लूकच असावा, अशी काही जणांची मागणी राहिली.
परिणामी, इमारतीच्या नियोजनात ८ ते १० महिने गेले, पोलिस स्टेशन दुसरीकडे स्थलांतर होण्यासाठीडी अवधी लागला.सतत ड्रेनेज लाईनचे पाणी साचणे, झाडे तोडण्यासाठी परवानगी मिळण्यात अडचणी आल्या. त्यानंतर इमारत परिसरातील अतिक्रमण केलेल्यांचा विरोध सुरू झाला.
त्यातून मार्ग काढून संपूर्ण जागा ताब्यात येण्यास २०२४चे वर्ष उजाडले. परिणामी, प्रत्यक्षात काम मे २०२४ मध्ये सुरू झाले. काही लोकांनी कामावेळी अडचणी निर्माण केल्या. तळमजल्याचे काम हाती घेतले. स्लॅब जोडणी सुरू झाल्यानंतर याच्या ड्राईंगवर सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तक्षेप घेतला.
त्यामुळे पुन्डा स्लॅबचे काम बदलून नव्याने सुरू करावे लागले. या सर्वामध्ये साडेतीन वर्ष गेले आहे. अद्यपी तळमजल्याचे काम पूर्ण झालेले नाही. चार मजली इमारत नेमकी केव्हा होणार असा प्रश्न आहे.
विघ्नसंतोषींचा त्रास
बांधकाम सुरू झाल्यापासून कामामध्ये काही विघ्नसंतोषीचा त्रास होत आहे. कर्मचाऱ्यांना दादागिरी करणे, बांधकामाच्या परिसरात गैरकृत्य केले जात आहे. याचा नाहकत्रास होत असून पोलिस प्रशासनाने याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
अशी आहे इमारत
पहिल्या दोन मजल्यांवर १०० वाहनासाठी पार्कींग, तिसऱ्या मजल्यावर करवीर तहसील कार्यालय, चौथ्या मजल्यावर करवीर पोलिस स्टेशन
स्टॅम्प व्हेंडर, स्टॅप रायटरवर उपासमारीची वेळ
करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस सुमारे १५० स्टॅम्प व्हेंडर, स्टॅम्प रायटर आहेत. येथून कार्यालय बी. टी कॉलेज येथे गेल्याने त्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. आर्थिक घडी विस्कटली आहे. दीड वर्षात काम पूर्ण होईल, असे त्यांना वाटले होते. परंतू साडेतीन वर्षात कामाला गती नाही. पुढील दीड वर्षही अशी स्थिती राहणार असल्याने ते चिंतेत आहेत.
नागरिकांची गैरसोय
करवीर पोलिस ठाणे कसबा बावडा येथे तर करवीर तहसील कार्यालय बी. टी कॉलेजमध्ये सुरू आहे. येथे कामानिमित येणाऱ्याना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. जुने दप्तर ठेवण्यासाठीही सुरक्षित जागा नसल्याची स्थिती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली
नवीन इमारतीच्या संथगतीने सुरू असणाऱ्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये कामासंदर्भात बैठक घेतली. १ वर्षात काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिले होते. त्यानंतर एक वर्ष झाले तरी एक मजलाही पूर्ण झालेला नाही.
दीड वर्षात काम पूर्ण होईल
तळ मजल्याच्या स्लॅब जोडणीचे काम सध्या सुरू आहे. तीन आठवड्यात स्लॅबचे काम पूर्ण होईल. तसेच सर्व इमारतीचे काम दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- अनिल येरूडकर, प्रकल्प अभियंता, करवीर तहसील








