बंडा साळुंखे यांची मागणी : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
इंग्रजी माध्यमाच्या प्रख्यात स्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवणाऱ्या एका शिक्षकाने 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस लावला होता. अशा स्टेटस्च्या माध्यमातून संबंधित शिक्षकाने कोणाचे प्रबोधन केले? असा सवाल करत संबंधित शिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांनी शुक्रवारी एका निवेदनाव्दारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली. यावेळी नेशन फर्स्टचे अवधूत भाट्य़े यांच्यासह हिंदूत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
एका बडय़ा शिक्षण संस्थेच्या स्कूलमध्ये जावेद अहमद नामक इंग्रजीच्या शिक्षकाने पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस्ला लावण्याचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी चर्चेचा विषय ठरला होता. विद्यार्थ्यांमध्येही खळबळ उडाली होती. त्यावर हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिंदूत्ववादी कार्यकर्ते बंडा साळुंखे आणि इतर हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देवून संबंधित शिक्षकाची संपूर्ण चौकशी करावी, तो जिहादी संघटनांशी संबंधित आहे काय? याबद्दलही माहिती घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
दरम्यान, संबंधित शिक्षकाने 5 ऑगस्ट हा काळा दिवस असून 370 कलम हटवल्याने आपण नाखूष असल्याची पोस्ट 5 ऑगस्ट रोजी केली होती. त्यानंतर संबंधित स्कूलमध्ये खळबळ उडाली होती. विद्यार्थीही संतप्त झाले होते. त्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी जावेद अहमदवर गुन्हा दाखल केला केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस् ठेवून जिहादीकरणाचे उदात्तीकरण तर केलेले नाही ना? असा प्रश्न बंडा साळुंखे यांना निवेदनात केला आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असे आवाहनही केले आहे.