तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद
कार्वे वार्ताहर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 17 व 18 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या तोडणी, ओढणी कामगारांच्या हक्कासाठी आणि अन्य मागण्यांसाठी ऊस रोको आंदोलनाला चंदगड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हलकर्णी फाटा येथे उसाने भरलेले ट्रक व ट्रक्टर अडवून स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गडय़ांण्णावर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
राजेंद्र गडय़ांण्णावर म्हणाले, ऊस कारखानदारीत आधुनिक तंत्रज्ञान आले. त्यामुळे इथेनॉल, मोलॅशिस व अन्य उत्पादनाची वाढ झाली. यामुळे एक टक्का रिकव्हरी कमी करून कारखानदार मोठी कमाई करत आहेत. याचाच एक हिस्सा ऊस उत्पादक शेतकऱयांना मिळावा. मागील एफआरपीचे दोनशे व यावषीच्या एफआरपी व 350 रु ज्यादा दर कारखानदारांनी द्यावा, असे सांगितले. गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फत ऊस तोडणी-ओढणी कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशा प्रमुख मागण्यांसाठी हे ऊस रोको आंदोलन केले असल्याचे सांगितले. प्रा. दीपक पाटील म्हणाले, या आंदोलनाचा फायदा तोडणी, ओढणी कामगार, शेतकरी आणि कारखान्यांनाही होणार आहे. बाहेरील तोडणी कामगारांकडून ओढणीधारक व कारखाना यांची करोडोची फसवणूक होत आहे. याउलट तोडणी कामगार आणायला गेलेल्या मालकांना तेथील लोक बळजबरी करून खोटे गुन्हे दाखल करत आहेत. पुन्हा हे गुन्हे मागे घेण्यासाठी वाहन मालकांना 50-60 हजार पोलिसांना मोजावे लागतात. अथर्व-दौलतचे शेती अधिकारी युवराज पाटील, गदळे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी बाळाराम फडके, सदानंद गावडे, विश्वनाथ पाटील, राजेंद्र पाटील, पिंटू गुरव, मिलिंद पाटील, धोंडिबा पाटील, प्रताप डसके, विलास नाईक उपस्थित होते. आभार शशिकांत रेडेकर यांनी मानले.