ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला जाहीर पाठिंबा; राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीसाठी पाठबळ; भाजपच्या भूमिकेविषयी उत्सुकता
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या युवराज संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संभाजीराजे यांचे अपक्ष लढण्याच्या मार्गात एक पाऊल पुढे पडले आहे.
दरम्यान, रायगड जिल्हय़ातील उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. संभाजीराजेंच्या राज्यसभा मोहिमेला जाहीर पाठिंबा देणारे बालदी राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमी भाजपच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे यांनी पुढील महिन्यात जूनमध्ये होणाऱया राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. संभाजीराजे यांना उमेदवारी अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची व निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. अनुमोदन देण्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि विरोधी पक्षातील भाजप या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.
संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांना अनुमोदन मिळणार काय?, राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळणार काय? याकडे साऱयांच्या नजरा लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेला महाविकास आघाडीचा पाठिंबा संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या मोहिमेतील पहिले सकारात्मक पाऊल ठरले आहे.
शरद पवार यांची संभाजीराजेंना ‘पॉवर’
नांदेड येथे पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर राज्यसभेतील प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी महाविकास आघाडीची मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ. शरद पवार यांच्या स्पष्टोक्तीने महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झाली आहे.
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा संभाजीराजेंना पाठिंबा देवून भाजपला कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आता भाजप कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. राष्ट्रपती नियुक्ती राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल 3 मे रोजी संपल्यानंतर संभाजीराजे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले होते. फडणवीस यांच्याशी संभाजीराजे यांचे सख्य आहे. त्यामुळे भाजपही संभाजीराजेंना पाठबळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत आज आघाडीची बैठक : अजित पवार
राज्यसभेच्या रिक्त सहा जागांच्या निवडणुकीत संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आज मंगळवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली. संभाजीराजे यांच्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
असे आहे सहाव्या जागेसाठीचे समिकरण
राज्याच्या विधानसभेत शिवसेनेचे 56 अधिक 9 अपक्षांचा पाठिंबा धरून 65 आमदारांचे संख्याबळ आहे. 53 आमदार असलेल्या राष्ट्रवादीला 2 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्या 55 होते. काँग्रेसचे 44 आमदार आहेत. महाविकास आघाडीतील या तीन्ही पक्षांचे संख्याबळ अपक्षांसह 164 होते. त्यात पुन्हा महाविकास आघाडीला म्हणून पाठिंबा दिलेले 8 आमदार आहेत. त्यामुळे एकूण संख्याबळ 172 इतके होते. कोट्य़ानुसार राज्यसभेचा एक खासदार निवडून येण्यास 42 मते (42 आमदार) लागतात. संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 1 खासदार निवडून येणार आहे. त्याचबरोबर भाजपचे त्यांच्या संख्याबळानुसार 2 खासदार निवडून येणार आहेत. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे 27 मते आहेत. त्यात पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची संख्या धरली तर महाविकास आघाडीची 46 मते होतात. संभाजीराजेंना निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे सध्या संभाजीराजे यांनी राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष आमदारांशी संपर्क वाढविला आहे.