कोल्हापूरसारख्या पुरोगामी विचाराच्या शहरात आजही असे कसे घडू शकते
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या घाटावर तीन दिवसांपूर्वी भूत लागलेली महिला आणि भूत उतरवणारा तथाकथित मांत्रिक यांचा व्हिडिओ चर्चेचा आला होता. कोल्हापूरसारख्या पुरोगामी विचाराच्या शहरात आजही असे कसे घडू शकते, हा मुद्दा त्यात ठळकपणे पुढे आला. पण वास्तव असे आहे, की भूतखेतं, भानामती असले प्रकार 100 टक्के खोटे असताना किंवा त्यात कोणतेही तथ्य नसताना कोल्हापुरात भूतखेतं, भानामती हा प्रकार पूर्वीपासून सुरू आहे आणि त्यात कोणतेही तथ्य नसताना काही लोकांचा त्यावर आजही अंधविश्वास आहे.
कोल्हापूरच्या गॅझेटीयरमध्येच ब्रिटिशांनी असल्या प्रकाराची नोंद करून ठेवली आहे. त्यामुळे भूत नसले तरी त्याची चर्चा मात्र आजही रंगतच आहे आणि एखाद्या आयक्यू घटनेत आपल्या पदरची आणखी काहीतरी भर घालून चर्चा जिवंत ठेवली जात आहे. भूतांच्या या बनावट प्रसंगात जयंती नाल्याच्या पुलाचा बहुतेक वेळा उल्लेख होतो.
वर्षानुवर्षे ऐकल्या जाणाऱ्या या कथेत रात्री कोणीतरी मोटारसायकलवरून जात होता. जयंती पुलावर महिला त्याच्या आडवी आली आणि मला लाईनबाजारला जायचे आहे, तेथे सोडा, असे हात जोडून म्हणू लागली. मग त्याने तिला मोटारसायकलवर मागे बसा, म्हणून सांगितले आणि तिला घेऊन तो पुढे निघाला. रमणमळ्याजवळ त्याला अचानक उदबत्ती पेटवल्याचा वास येऊ लागला.
त्याने मागे बघितले तर ती महिला दात विचकटून हसत होती आणि हसता–हसता ती गायब झाली. मग तो मोटारसायकलस्वार घाबरला. तो जाग्यावरच बेशुद्ध झाला. दिवस उजाडायच्यावेळी त्याला कोणीतरी तोंडावर पाणी मारून उठवले. भूताची ही बनावट कथा वर्षानुवर्षे सांगितली जात आहे. या कथेत ठिकाणी वेगवेगळे म्हणजे कोल्हापूरच्या चारही बाजूच्या प्रवेश मार्गाची आहेत.
या कथेतला मोटारसायकलवाला कोण, हे कोणाला माहित नाही. त्याच्या मोटारसायकलवर बसलेले भूत कसे होते, हेही कोणी पाहिले नाही. पण आजही ही कथा रंगवून सांगितली जात आहे. कोल्हापुरातल्या सामाजिक, धार्मिक परिस्थितीविषयी बॉम्बे गॅझेटीयरमध्ये असलेल्या उल्लेखावरून कोल्हापूरात भूत–पिशांच्चावर लोकांचा विश्वास होता.
या भूताची वक्रदृष्टी होऊ नये म्हणून किंवा झालीच असेल तर ती दूर व्हावी म्हणून गल्लीच्या किंवा एखाद्या रस्त्याच्या टोकाला रात्रीच्यावेळी लिंबू उतरून टाकणे, भात, अंडी, लिंबू यांची छोटी परडी गुलाल–बुक्का, हळद–कुंकू लावून ठेवणे या प्रथा पाळल्या जात होत्या. अजूनही काही ठिकाणी रस्त्याच्या कोपऱ्यावर लिंबू किंवा परडी ठेवलेली दिसते, हे वास्तव आहे.
गॅझेटमधील नोंदीनुसार कोल्हापुरात दोन प्रकारची भूते असल्याचे मानले जात होते. एखाद्याचे डोळे लालभडक झाले किंवा तारवटल्यासारखे दिसू लागले किंवा त्याला झटके येऊ लागले व तो असंबद्द बोलू लागला तर त्याला भूत लागले, असे समजले जात होते. ही लक्षणे अन्य कोणत्याही शारीरिक व्याधीची असावीत, असा विचारही त्याकाळी कोणी करत नव्हते.
घरचे भूत आणि बाहेरचे भूत अशीही या भूतांची वर्गवारी केली जात होती. वेताळ, अलवंतीन, ब्रह्मपुरुष, अस्त्र चंडकाई, चुडेल, येलमळताई, फिरंगी गिर, जखिण, खवीस, म्हसोबा, मुंजा, झोटिंग या नावाने भूतांना ओळखले जात होते. ही भुते झाडावर, नदी तळ्यानजीक तिकटीवर असतात, असा एक समज होता. जेव्हा एकटा–दुकटा माणूस रात्री जात असतो. तेव्हा मनुष्याच्या रूपात भूत त्यास गाठते व एकाएकी उग्ररूप धारण करून त्याला घाबरून सोडते .हे घाबरवणे असे की माणूस भीतीने वेडा होतो व त्याला भूत लागते, असे मानले जात होते .
आणखी एक अंधश्रद्धेची नोंद अशी की वेताळ हा भुतांचा राजा आहे. त्याचे पाय उलटे असतात, त्याच्या हातात शंख असतो. तो पालखीतून फिरतो. बाळंतपणात मृत्यू झालेल्या महिलेच्या भुताला अलवंतीन असे म्हटले जाते. या महिलेचे भूत ज्याला लागते तो पाणी दिसले की त्या दिशेला पळतो.
विवाहित पुरुष मरण पावला व त्याची काही अतृप्त इच्छा असेल तर त्याला ब्रह्मसंबंध भूत म्हणून ओळखले जात होते. लहान मुलांना मुलींना चंकी किंवा चंडकाई भुताची भीती असते. एखाद्या लहान मुलास तापाने झटके येऊ लागले की अजूनही काही घरात नदीकाठची माती आणून त्याच्या छोट्या–छोट्या बाहुल्या केल्या जातात आणि पाण्यात सोडल्या जातात.
ब्रिटिश राजवटीत येथे असणाऱ्या एका ब्रिटिश कुटुंबातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता, त्याचे भूत म्हणजे फिरंग्याचे भूत म्हणून ओळखले जात होते. त्याशिवाय खवीस व भूतमुंजा अशीही भूतांची नावे होती. पण यातली कोणतीही गोष्ट खरी नव्हती. गळ्यात ताईत बांधणे, झाडाच्या पातळ फांद्यांनी झोडपणे, मिरच्यांची धुरी देणे, खारा नैवेद्य सोडणे, उंबऱ्यात लोखंडी नाल किंवा झाडात खिळे ठोकणे हे भूत उतरवण्यावर उपाय केले जात होते.
एखादी व्यक्ती असंबंध बडबड करते म्हणून त्याला एखादा मानसिक विकार झाला, हे त्याकाळी मान्य केले जात नव्हते. त्याला भूत लागले, असेच मानले जात होते. आजही बिंदू चौकाच्या तटाच्या कोपऱ्यावर लिंबू, भात, अंडे भरलेल्या परड्या दिसतात . करवीर तहसील कचेरीजवळ एक स्तंभ होता, दुसऱ्या महायुद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ तो स्तंभ उभा केला होता.
पण या स्तंभाचे दगड म्हणजे लिंबू, दहीभात हा भूताचा नैवद्य ठेवण्याचे ठिकाण झाला होता. आज कोल्हापूर बरेच बरच बदलले आहे. भूत, भानामती पिशाच्च याच्या गप्पा फारशा नाहीत. पण अधूनमधून उठणारी चर्चा मात्र कायम आहे आणि ही चर्चा जुन्या कोल्हापूरच्या समाजजीवनाचे एक अंग दर्शवणारी आहे.
रमणमळ्यात असे प्रकार रोखण्यासाठी कायदेशीर कारवाईचा फलक
रमणमळा कोपऱ्यावर साहेबांचे तळे म्हणून एक छोटे तळे आहे. तळ्याभोवती दाट झाडी आहे. त्या रमणमळ्यातील एका कॉलनीच्या भिंतीवर येथे लिंबू, दहीभात, काळी बाहुलीची परडी ठेवू नये. ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा फलकच काही दिवसांपूर्वीपर्यंत होता.








