वारणानगर/प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील नुरमहमंद मुल्ला यांच्या मालकीच्या तीन बकऱ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून ठार केले यामध्ये सुमारे ७५ हजार रूपयाचे नुकसान झाले आहे असे मुल्ला यानी सांगीतले.
कोडोलीत गतसप्ताहात दोन बालकांवर सलग दोन दिवस मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. आज गुरूवारी सकाळी पंचवटी गणेश मंदीर बाजूला असणाऱ्या वगळीच्या बाजूने चरत असलेल्या बकऱ्यावर मोकाट कुत्यांनी हल्ला केला यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुत्र्यांवरील कारवाई बाबत उलट्या कायद्याचा परिणाम
नगरपालिकेची ग्रामपंचायत झालेल्या कोडोलीची लोकसंख्या सुमारे ५० हजारावर आहे. दरम्यान, गावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. नगरपालिकेला मोकाट कुत्र्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. तसेच नगरपालिका या कुत्र्यांची विल्हेवाट लावू शकते. परंतु ग्रामपंचायतीला मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीला असे अधिकार नसल्याने ग्रामस्थांना भेडसावणारा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सोडवायचा कसा? असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांवर कारवाई बाबत कायद्याचा उल्टा परिणाम काय असतो हे अनभुवायला मिळत आहे.









