आदर्श शिक्षक आणि संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार वितरण
कोल्हापूर : प्रतिनिधी
नवीन पीढी घडवणे शिक्षकांच्या हातात आहे. गावाचे, जिह्याचे नव्हे तर राज्य आणि देशाचे भविष्य शिक्षक घडवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत रहा, असा गुरूमंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022, 23 पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षकांना तसेच संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान विजेत्या गामपंचायतीस पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत पाटील आसगावकर, सीईओ संतोष पाटील, माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुष्मा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, मनिषा देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर म्हणाले संपुर्ण राज्यात कोल्हापूर जिह्याने एक वेगळेपण जपले आहे. आपल्या जिह्यातील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवतात. या यशामागे शिक्षकांचा खूप मोठा वाटा असून याचा अभिमान आहे. सध्या जिल्हा प्ररिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यावर भर आहे. विद्यार्थांना गणवेश, वह्या, शूज मोफत पुरवले जात आहे. तर शिक्षकांसाठीही अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. यापुढे शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे कोणतेही काम शिक्षकांना विनापरवाना देता येणार नाही,
केसरकर म्हणाले, शिक्षकांना चॉईस पोस्टिंगची सुविधा देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेवरती भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र असे पहिले राज्य आहे, ज्या ठिकाणी इंजीनियरिंगचा अभ्यासक्रम मराठीमध्ये शिकवला जाणार आहे. अशा अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले आहेत. शिक्षण विभागातील शिक्षक हा खूप महत्वाचा घटक असतो. शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांसाठी असतो, त्यामुळे पुढची पिढी घडवणे तुमच्या हातात आहे, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत रहा.
कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2022 मधील 14 जणांना तर 2023 मधील 12 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. यासह दोन्ही वर्षाचे विशेष जिल्हा शिक्षक पुरस्काराचे देखील वितरण करण्यात आले. यानंतर संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानातील विजेत्या गामपंचायतीस पुरस्कार वितरण करण्यात आले. यामध्ये 2019-20 मध्ये प्रथम क्रमांक हातकणंगले तालुक्यातील संभापूर, द्वितीय क्रमांक शाहूवाडी तालुक्यातील शिवारे, तृतीय क्रमांक आजारा तालुक्यातील शृंगारवाडी गामपंचायतींना देण्यात आला. 2020-21 व 2021-22 मध्ये प्रथम क्रमांक आजरा ताल्यक्यातील वाटंगी, द्वितीय क्रमांक आंबपवाडी, तृतीय क्रमांक पन्हाळा तालुक्यातील पोखले या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते