म्हासुर्ली / वार्ताहर
गेल्या २२ वर्षापासून रखडलेल्या राई (ता.राधानगरी ) येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामाची वर्क ऑर्डर काढून ९ मे पर्यंत काम सुरू करावे. अन्यथा कोल्हापूर येथील पाटबंधारे कार्यालयासमोर धामणी प्रकल्प जन संघर्ष समितीच्यावतीने १०० तरुण आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.
गेल्या २२ वर्षांपासून राई (ता.राधानगरी ) येथील धामणी नदीवरील धामणी मध्यम प्रकल्पाचे काम रखडले आहे. शासन स्तरावर लोकप्रतिनिधी प्रकल्पाचा योग्य तो पाठपुरावा करत आहेत. मात्र तरीही प्रकल्पाचे काम सुरू करण्यास शासन स्तरावर चालढकल होत असल्याने धामणीवासियांतून संताप व्यक्त होत आहे.
परिणामी यातून धामणी खोऱ्यातील सुशिक्षित तरुण वर्ग जागृत झाल्याने धामणी प्रकल्प जन संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यापासून एकत्र आला आहे. तसेच सोशल मिडिया व बैठकामधून युवावर्गात जनजागृती केली असल्याने शेकडो तरुण धामणी धरणावर बाबत आक्रमक भूमिकेत आहेत.
त्यानुसार तरुणांनी स्थापण केलेल्या धामणी प्रकल्प संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने ७ एप्रिल २०२२ रोजी पाटबंधारे विभगाचे कार्यकारी अभियंता एस आर पाटील यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या कामाबाबत चर्चा केली होती. त्यावेळी पाटील यांनी मे महिन्यात काम सुरू करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले होते. तसेच १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची ही शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी रेखावर यांनी ३० मे पर्यंत काम सुरू करणार असल्याचे सांगितले होते.
मात्र १ मे ला ही प्रकल्पाचे सुरू न झाल्याने युवकांची धामणी प्रकल्प जन संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. त्यानुसार जनसंघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पाटबंधारे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी ९ मे पर्यंत धामणी प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत ठोस अशी कार्यवाही करावी, अन्यथा कोल्हापूर येथील पाटबंधारे कार्यालयाच्या दारात धामणी खोऱ्यातील १०० तरुण आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यात वातावरण पुन्हा एखदा तापले आहे.