शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून परिपत्रक जाहीर : 10 ते 13 ऑगस्टपर्यंतचे होणाऱ्या पेपरचे नवीन वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर होणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू आहेत. परंतू कोल्हापूर जिल्ह्य़ात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने 10 ते 13 ऑगस्टपर्यंतचे पेपर पुढे ढकलण्यात आले होते. या पेपरचे नवीन वेळापत्रक यथावकाश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती परिपत्रकाद्वारे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत उन्हाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तरच्या ऑफलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा सुरू आहेत. सध्या जिल्ह्य़ात पावसामुळे सुरूवातीला 10 व 11 ऑगस्टचे पेपर पुढे ढकलण्यात आले होते. परंतू पावसाचा जोर कायम असल्याने पूर परिस्थितीत वाढ होत असल्याने शुक्रवार 12 व शनिवार 13 ऑगस्ट रोजी होणारे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत. कारण महापुरामुळे विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी 10 ते 13 ऑगस्टपर्यंत होणारे पेपर स्थगित करण्यात आले आहेत. स्थगित पेपरचे नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे, याची नोंद महाविद्यालय, शिक्षणसंस्था, अधिविभाग, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन परीक्षा संचालक डॉ. जाधव यांनी केले आहे.