5 पैकी 4 स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा : टीमवर्क, दैनंदिन सरावाचे फलित, संपूर्ण हंगामातून साडे पाच लाख रुपयांची कमाई, समर्थक रिचार्ज
संग्राम काटकर कोल्हापूर
शिवाजी तरुण मंडळाने 1992 साली 3 फुटबॉल स्पर्धा जिंकून कोल्हापुरी फुटबॉल हंगामावर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर तब्बल 3 दशकांनी शिवाजी मंडळाने यंदाच्या फुटबॉल हंगामात आंतरराष्ट्रीय संघाप्रमाणे दर्जेदार खेळ करुन 5 पैकी 4 स्पर्धा जिंकून हंगामावर वर्चस्व राखत शिवाजी पेठेसह अख्ख्या फुटबॉल शौकिनांची मने जिंकली. शिवाय पूर्वीच्या स्पर्धांमधील हाराकिरीमुळे नाराज झालेल्या समर्थकांनाही रिचार्ज करुन 5 लाख 50 हजार रुपयांच्या रोख रकमेची बक्षीसे ही खिशात घातली. या मोठय़ा यशामागे शिवाजी मंडळाने उमद्या व अनुभवी खेळाडूंची मिळून केलेली संघ बांधणी, खेळाडूंचा अखंडीत सराव, सामन्यात खेळांडूनी ठेवलेला समन्वय, प्रतिस्पर्धी संघावर वेगाने केलेला रिऍटॅक आणि आयएसएलच्या धर्तीवर खेळाडूंना मिळालेले प्रशिक्षक या बाबी दडल्या आहेत.
छत्रपती शाहू स्टेडियममध्ये ईर्ष्येने रंगत राहणाऱया कोल्हापुरी फुटबॉल विश्वात पाटाकडील तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ व शिवाजी तरुण मंडळ या संघांकडे बलाढय़ संघ म्हणून पाहिले जाते. शिवाय गेल्या 8 ते 10 वर्षातील स्पर्धां डोळ्यासमोर घेतल्यास अंतिम सामन्यात पाटाकडील, दिलबहार, बालगोपाल व फुलेवाडी हेच संघ दाखल झाल्याचे दिसून येते. या संघांमधील खेळाडूंनी ही दमदार खेळ करुन आपला चाहता वर्ग तयार केला आहे. इतकेच नव्हे तर दिलबहारने 2014-15 साली 4, बालगोपालने 2015-16 साली 3 तर पाटाकडीलने 2016-17 साली 2 व 2017-18 साली 6 स्पर्धा जिंकून लाखो रुपयांची बक्षीसे मिळवली होती. या बक्षीसांमुळे या संघांना संघ मजबूत करणे सोपे झाले होते.
असे सगळे चित्र एकीकडे असतानाच शिवाजी मंडळाला 2015 साली नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्यावरच समाधान मानावे लागले होते. शिवाय इतर स्पर्धेतील हाराकिरीमुळे समर्थक कमालीचे नाराज होते. अनेक समर्थकांनी तर शिवाजी मंडळाचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाणे टाळले होते. अशा विचित्र परिस्थितीतील तोंड देत शिवाजी मंडळ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या फुटबॉल हंगामासाठी छत्रपती शाहू स्टेडियममध्ये उतरले. पहिल्या-वहिल्या केएसए लीग वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत शिवाजी मंडळाने 7 सामने खेळून 14 गुणांच्या कमाईसह लीग चॅम्पियनशीप पटकावली. तब्बल 19 वर्षांच्या कालखंडानंतर मिळालेल्या लीग चॅम्पियनशीपचे साऱयांना कौतुक वाटलं. लीगनंतर झालेल्या केएम चषक चॅम्पियनशीप स्पर्धेतही दर्जेदार खेळ करुन शिवाजी मंडळाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत मुसंडी मारली होती. मात्र दुर्देवाने शिवाजी मंडळाला दिलबहारकडून टायब्रेकरमध्ये 3-0 गोलने पराभव स्वीकारुन दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. असे घडले असले शिवाजी मंडळाने दिलबहारकडून झालेल्या पराभवाचे दडपण घेतले नाही. उलट सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळ करुन पुन्हा अंतिम फेरीत उडी घेतली. या फेरीत केएम चषक स्पर्धेत केलेल्या पराभवाचे उट्टे काढत शिवाजी मंडळाने बलाढय़ दिलबहारचा 3-1 गोलफरकाने पराभव करून सतेज चषकासह दोन लाख रुपयांचे बक्षीसही खिशात घातले. यानंतर झालेल्या राजर्षी छत्रपती शाहू चषक फुटबॉल स्पर्धेबरोबरच नेताजी चषक फुटबॉल स्पर्धाही जिंकून शिवाजी मंडळाने हंगामात जेतेपदाची हॅटट्रिक साधली. या दोन्ही स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाटाकडीलला शिवाजी मंडळाने पराभव धक्का दिला. शिवाय संपूर्ण स्पर्धेत गोलरक्षक मयुरेश चौगुलेसह करण चव्हाण-बंदरे, संकेत साळोखे, विक्रम शिंदे, विशाल पाटील, योगेश कदम, रोहन आडनाईक, ऋतुराज सूर्यवंशी यांच्यासह सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ करुन समर्थकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवून संपूर्ण फुटबॉल हंगामावर वर्चस्वही सिद्ध केले.








