प्रतिनिधी/शिरोळ
अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील पंचायत समिती माजी सभापतींच्या घरावर गुरुवारी सकाळी पाऊणे आठच्या सुमारास आयकर विभागाने छापा टाकला. या कारवाईची अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना नव्हती. दुपारपर्यंत घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती घेतली. जयसिंगपूर-संभाजीपूर येथील अलिशान बंगल्यांची पाहणी करून सांगलीतील प्लॉटचीही पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत या पथकाकडून कागदपत्रे व चौकशीचे काम सुरू होते. मात्र, या चौकशीत काय निष्पन्न झाले. याची मात्र, माहिती मिळू शकली नाही.
अर्जुनवाड येथील तालुक्याचे सभापती पद भूषविलेल्या महिला पदाधिकाऱयांच्या पतीचा पुर्वीपासून गौण खजिनाचा व्यवसाय आहे. शिवाय वाळू उपसा बोटी तयार करण्याचा कारखाना, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद व सोलापूर जिह्यातील साखर कारखान्यात भागिदारी आहे. कारखान्यातील काही भानगडीमुळे प्रमुखाची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर या प्रमुखाचा भागिदारी असलेल्यांच्या घरावरही गुरूवारी आयकर विभागाने छापा टाकला या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी सकाळी पाऊणे आठ वाजता एक पथक अर्जुनवाड येथे दाखल झाले. या पथकाने घरातील सर्व कपाटे, विविध साहित्य, चार चाकी वाहने, जनावरांचा गोठा यासह विविध ठिकाणी असलेल्या कागदपत्रांची झाडाझडती घेतली. दोन अधिकारी यासर्व कागदपत्रांची पडताळणी करीत असताना अन्य अधिकारी चौकशी करीत होते. यावेळी कोल्हापूर येथून सोबत घेऊन आलेल्या पोलीस बंदोबस्तही होता. दुपारी या पथकाने आपला मोर्चा जयसिंगपूर, संभाजीपूर येथे असणाऱया आलिशान बंगल्याची पाहणी करून तपासणी केली. त्यानंतर सांगली येथील प्लॉटचीही पाहणी केली. यानंतर पथक दुपारी पुन्हा अर्जुनवाड येथे आल्यानंतर पुन्हा कागदपत्रांची जुळवाजूळव करून चौकशीचे काम सुरू होते. रात्री उशीरापर्यंत आयकरचे अधिकारी या दाम्पत्याकडून माहिती घेत होते. गुरुवारी झालेल्या या कारवाईमुळे शिरोळ परिसरात खळबळ उडली आहे.
हे ही वाचा : अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे